Ramdas Athawale : मनसेला मंत्रिमंडळात घेण्यास आमचा विरोध, आरपीआयला मंत्रिमंडळात स्थान हवं, आठवलेंची मागणी
एकीकडे मनसेला शिंदे सरकार मध्ये स्थान मिळण्याची चर्चा सुरू असताना आठवले यांनी मात्र याला विरोध केल्यानं यातून आता कोणता वाद येत्या काळात निर्माण होतो का ? ते पहावं लागेल.
कल्याण : राज्यात अचानक सत्ता पालट होऊन आता भाजपाच्या पाठिंब्याने शिंदे सरकार (Eknath Shinde) अस्तित्वात आलंय. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर मंत्रिमंडळात कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळणार? यांवर देखील खलबतं सुरू आहेत. आरपीआयचे रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही शिंदे सरकार मध्ये आम्हला मंत्रिपद मिळावं अशी मागणी मांडली होती. याविषयी अधिक बोलताना कल्याणात अत्रे नाट्यगृहात एका खाजगी कार्यक्रमात आठवले यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. मनसेला (MNS) मंत्रिमंडळात घेण्याचा काही संबंध नाही असे ते म्हणालेत. मनसे हा वेगळा पक्ष आहे. तो ना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे ना आमच्यासोबत ! ते निवडणूकीत आमच्यासोबत नव्हते. त्यांना मंत्रिपद दिलं तर आमचा विरोध आहे. मंत्रिपद देण्याचा काही विचार होत असेल तर आम्ही विरोध करू असही आठवले म्हणाले. त्यामुळे एकीकडे मनसेला शिंदे सरकार मध्ये स्थान मिळण्याची चर्चा सुरू असताना आठवले यांनी मात्र याला विरोध केल्यानं यातून आता कोणता वाद येत्या काळात निर्माण होतो का ? ते पहावं लागेल.
शिंदे यांचा गट म्हणजेच खरी शिवसेना
शिंदे यांच्या बंडानंतर आणि त्यानंतर निर्माण झालेल्या सरकारवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. विशेषतः शिवसेनेत उभी फूट पडल्याने शिवसेना नक्की कोणती आहे आणि कोणाची आहे? यावरुनही रस्सीखेच सुरू आहे. आरपीआयचे रामदास आठवले यांनी मात्र याबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला कंटाळून आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यांचा समाचार घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. दोन तृतीयांश पेक्षाही त्यांच्याकडे जास्त आमदार आहेत त्यामुळे शिंदे गटच खरी शिवसेना आहे असे आठवले म्हणालेत.आमचा शिंदे यांना पूर्ण पाठींबा आहे. आरपीआय ज्यांच्या बाजूने असते त्यांना सत्तेवर येण्याची संधी मिळते. आगामी काळात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आम्ही पाठींबा देऊच पण त्यासोबतच येत्या विधानसभा निवडणुकीत दोनशे जागा जिंकू असा विश्वास देखील आठवले यांनी व्यक्त केलाय.
मंत्री मंडळाच्या विस्तारात आरपीआयला मंत्रीपद नक्की
आरपीआयला नक्कीच एखादं मंत्री पद मिळेल सत्तेत सहभाग मिळेल , अधिवेशनापुरत जे मंत्री मंडळ आहे ते शॉर्टमध्ये बनवण्यात येणार आहे, जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा आरपीआयला नक्कीच एखादं मंत्री पद मिळेल. सत्तेत सहभाग मिळेल ,आणि एखादे एमएलसीसाठी प्रयत्न सुरूआहेत. त्यात महामंडळ उपाध्यक्ष सभासद नक्की मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
शिंदे यांच्या व्हायरल व्हिडिओवर मांडली भूमिका
इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकाऱ्यांशी फोनवरून पूरपरिस्थितीची विचारणा करतानाचे काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. यावरुन देखील आठवले यांनी शिंदे यांना पाठींबा दिलाय. आधीचे मुख्यमंत्री सुद्धा फोनवर बोलत होते. अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून शिंदे यांनी त्यांना काही काम सांगितलं असेल तर त्यात काही गैर नाही. या व्हिडिओवर कोणी टीका करत असेल तर त्याला काही अर्थ नाही.