रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे CEO विकास खानचंदानी यांना जामीन
मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेटच्या एका न्यायालयाने विकास खानचंदानी यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिल्याची माहिती खानचंदानी यांचे वकिल नितीन प्रधान यांनी दिली आहे
मुंबई: कथित TRP घोटाळ्या प्रकरणी रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे (Republic TV)मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात CEO विकास खानचंदानी यांना मुंबईतील एका न्यायालयानं अखेर आज जामीन दिला आहे. मुंबई पोलिसांच्या गुप्तचर विभागानं रविवारी खानचंदानी यांना त्यांच्या घरातून अटक केली होती. मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेटच्या एका न्यायालयाने खानचंदानी यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिल्याची माहिती खानचंदानी यांचे वकिल नितीन प्रधान यांनी दिली आहे. (Republic TV CEO Vikas Khanchandani gets bail)
टेलीव्हिजन रेटींग एजन्सी ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊंन्सिल’ अर्थात BARC कडून हंसा रिसर्च एजन्सीच्या माध्यमातून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या कथित TRP घोटाळ्याची चौकशी सुरु केली आहे. हंसाच्या एका अधिकाऱ्याने लोकांच्या घरी जात त्यांना पैसे देऊन फक्त ठराविक चॅनेल लावून ठेवण्यास सांगितलं होतं. त्यात बॉक्स सिनेमा, फक्त मराठी, महा मुव्ही आणि रिपब्लिक टीव्हीचा समावेश होता. दरम्यान, रिपब्लिक टीव्हीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे.
आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची नाव
आरोपींची नाव – अटकेची तारीख
1) विशाल वेद भंडारी – 7 ऑक्टोबर 2) बोंम्पेल्लीराव नारायण मिस्त्री – 7 ऑक्टोबर 3) शिरीष सतीश पट्टण शेट्टी – 8 ऑक्टोबर 4) नारायण नंदकिशोर शर्मा – 8 ऑक्टोबर 5) विनय राजेंद्र त्रिपाठी – 12 ऑक्टोबर 6) उमेश चंद्रकांत मिश्रा 7) रामजी दुधनाथ शर्मा 8) दिनेश पन्नालाल विश्वकर्मा 9) हरीश कमलाकर पाटील 10) अभिषेक कोलवडे 11) आशिष अबीदूर चौधरी – 28 ऑक्टोबर 12) घनश्याम सिंग 13) विकास खानचंदानी – 13 डिसेंबर
काय आहे प्रकरण?
“रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी 400 ते 500 रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे. त्यामुळे आता या टीआरपीच्या आधारे संबंधित चॅनेल्सला मिळालेल्या जाहिरातींचीही चौकशी केली जाईल. तसेच हे जाहिरातदारही या रॅकेटमध्ये सहभागी होते का, याचा तपास केला जाईल” अशी माहिती परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टीआरपी म्हणजे काय?
टीआरपीचा अर्थ टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (Television Rating Point ) असा होतो. यावरुन प्रेक्षक कोणते टेलिव्हिजन चॅनेल जास्त पाहतात, हे ठरवले जाते. टेलिव्हिजन विश्वात कोणती मालिका किंवा वृत्तवाहिन्यांवरील कोणता शो सर्वात जास्त लोकप्रिय आहे, याचे मोजमापही टीआरपीच्या आधारेच केले जाते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जाहिराती मिळवण्यासाठी टीआरपी रेटिंग अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
संबंधित बातम्या:
TRP Scam | फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक केलेले ‘ते’ 13 जण कोण?
TRP Scam | गुन्हे शाखेकडून आणखी 6 जणांना समन्स जारी, रिपब्लिकच्या अडचणीत वाढ
Republic TV CEO Vikas Khanchandani gets bail