‘पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून…’, रोहित पवार राज्यपालांवर भडकले, नेमकं प्रकरण काय?
संभाजीराजे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांनी देखील राज्यपालांवर निशाणा साधलाय.
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या कळातील आदर्श आहेत, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सध्याच्या काळाचे आदर्श आहेत, असं विधान केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वादळ निर्माण होताना दिसतंय. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांच्या विधानावर आक्षेप घेतलाय. त्यांनी राज्यपालांवर टीका केलीय. संभाजीराजे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांनी देखील राज्यपालांवर निशाणा साधलाय.
“राज्यपाल महोदय, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात”, असा खोचक टोला रोहित पवारांनी ट्विटरवर लगावला.
“पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही”, अशी टीका त्यांनी केली.
“विशेष म्हणजे मागील दोन दिवस पेटून उठलेले आज मात्र नक्कीच पेटणार नाहीत, याची खंत वाटते”, असं म्हणत रोहित पवारांनी भाजपवर देखील निशाणा साधलाय.
राज्यपाल महोदय, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात. पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही. विशेष म्हणजे मागील दोन दिवस पेटून उठलेले आज मात्र नक्कीच पेटणार नाहीत, याची खंत वाटते. pic.twitter.com/ALXMrHjdsY
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 19, 2022
राज्यपाल नेमकं काय म्हणाले?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.
“आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असं वाटतं तुम्हाला कोणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील”, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.