AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप, अजित पवार, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ महादेव बेटिंग अ‍ॅपचे सदस्य?

महादेव बेटिंग अ‍ॅपच्या प्रकरणावरुन देशातील वातावरण तापलं आहे. अनेक मोठ्या लोकांची नावे या प्रकरणामुळे चर्चेत येत आहे. असं असताना संजय राऊत यांनी आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकारमधील तीन मोठ्या मंत्र्यांची नावे घेत गंभीर आरोप केले आहेत.

संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप, अजित पवार, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ महादेव बेटिंग अ‍ॅपचे सदस्य?
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 3:24 PM

मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : महादेव बेटिंग अ‍ॅपच्या प्रवर्तकाने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणावरुन छत्तीसगडमधील राजकीय वातावरण तापलं आहे. संबंधित प्रकरणावर देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात आपल्या भाषणात या प्रकरणावरुन भाजपला टोला लगावला होता. “भूपेश बघेल भाजपात गेले तर महादेव बेटिंग अ‍ॅपचं हरहर महादेव होईल”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर लगेच आज दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर महाराष्ट्रातील तीन मोठ्या सत्ताधारी नेत्यांबाबत गंभीर दावा केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे महादेव बेटिंग अ‍ॅपचे सदस्य आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. भाजप त्यांना तुरुंगात टाकणार होतं. पण आता पुजा करत आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

“भूपेश बघेल भाजपमध्ये सहभागी झाले तर त्यांना तिथे देवाचं स्थान दिलं जाईल. त्यांच्यावर हरहर महादेव म्हणत अभिषेक केला जाईल. महाराष्ट्रात अजित पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ हे देखील महादेव अ‍ॅपचेच सदस्य आहेत ना? त्यांची पुजा केली जाते. त्यांना जेलमध्ये पाठवायचं होतं. आता त्यांची पुजा केली जातेय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्यावर फुलं उधळत आहेत”, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.

‘हे अनाड्यांचं सरकार, अनाडी घोडे उधळले’

राज्यात नुकतंच ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. त्यापोठापाठ अजित पवार यांच्या पक्षाला सर्वाधिक यश आलंय. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झालाय. या निवडणुकीवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

“मुख्यमंत्री काय बोलतात याकडे महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नाही. ग्रामपंचायत निवडणुकांनंतर फटाके घटनाबाह्य सरकार वाजवते ते फुसके आहेत. निकालाचे आकडे प्रत्येक जण आपापल्या बाजूने दाखवत आहे. आम्ही कसे जिंकलो आणि विरोधक कसे हरले हे दाखवत आहेत. हा एक मूर्खपणा आहे. या निवडणुका पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत, हे जर घटनाबाह्य सरकारला माहीत नसेल तर हे अनाड्यांचं सरकार आहे असं म्हणावं लागेल. हे अनाडी घोडे उधळले आहेत”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

“जे राजकीय पक्ष विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका घ्यायला घाबरतात, त्यांची हातभर फाटते. त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावर दावा सांगावा हे हास्यास्पद आहे. जे 14 महापालिकांच्या निवडणुका घेत नाहीत ते सांगतात आम्ही ग्रामपंचायत निवडणुका जिंकलो. तुम्ही सिनेट आणि मुंबई महापालिका सह इतर 14 महापालिकांच्या निवडणुका घ्या आणि मग सांगा कोण जिंकलं, कोण हरलं?”, असं संजय राऊत म्हणाले.

“ते काही आकडे सांगू दे त्यांना आकडा लावायची सवय आहे. त्यांची आता फक्त आकड्यांचेच खेळ चालू आहेत. 50 खोके, 40 खोके. सिनेटच्या निवडणुका जाहीर झालेले असताना तुम्ही रडीचा डाव खेळत आहात. त्यांचा एक पक्ष आणि एक निवडणूक असं ठरतंय”, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.