VIDEO : TV9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट, अमित शाह महाराष्ट्राचे शत्रू क्रमांक 1, ठाकरेंच्या बड्या नेत्याची टीका
शिवसेना आणि धनुष्यबाणाचा निर्णय शिंदेंच्या बाजूनं गेला आणि यासाठी ठाकरे गटानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना जबाबदार धरलंय.
मुंबई : शिवसेना आणि धनुष्यबाणाचा निर्णय शिंदेंच्या बाजूनं गेला आणि यासाठी ठाकरे गटानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना जबाबदार धरलंय. अमित शाह महाराष्ट्राचे शत्रू क्रमांक 1 असल्याची टीका राऊतांनी केलीय. अमित शाहांनी महाराष्ट्रात येऊन ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. तसंच शिंदेंना शिवसेना धनुष्यबाण मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं. त्यावरुन अमित शाहांना संजय राऊतांनी महाराष्ट्राचा शत्रू नंबर 1 म्हटलंय.
शिवजयंतीच्या निमित्तानं गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले. व त्यांनी मिंध्यांना शिवसेना-धनुष्यबाण मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मिंध्यांना धनुष्यबाणाचे चिन्हं मिळाले ते याच अमित शाहांच्या मेहेरबानीने हे काही लपून राहिले नाही. हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकांचा शत्रू आहे. मोदी युग आता संपले आणि बाळासाहेब ठाकरे व त्यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेशिवाय महाराष्ट्रात भाजपला कुत्रेही विचारणार नाही. त्यामुळं त्यांनी शिवसेनेवर दरोडा टाकला व आपले तळवे चाटणाऱ्या मिंध्यांना मुख्यमंत्री केलं.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटल्याची टीका अमित शाहांनी केली होती. त्यावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राऊतांचा तोल गेला. त्यानंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक झालीय. संजय राऊतांच्या याच वक्तव्यावरुन, नाशिक आणि मुंबईत गुन्हे दाखल झालेत. तर राऊतांवर आणखी गुन्हे दाखल होतील असा इशारा गोगावलेंनी दिलाय.
इकडे उद्धव ठाकरेंनीही अमित शाहांचा उल्लेख मोगँम्बो असा असा केल्यानं भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही ठाकरेंवर पलटवार केलाय. शिंदे आणि ठाकरेंच्या संघर्षात आता टीकेनंही टोक गाठलंय, राऊतांच्या भाषेवरुन तेच दिसतंय.