मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांचं ऐकणार की बेगडी शरद पवारांचं ऐकणार या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे (raj thackeray) म्हणतात ते बकवास आहे. त्यांना बाळासाहेब किती आठवतात ते पाहावं लागेल. ज्यांनी बाळासाहेबांना सोडलं. बाळासाहेबांचा विचार सोडला. ज्या भाजपने सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांचे उपवस्त्र म्हणून जे राहतात त्यांनी काय हिंदुत्व शिकवावं. हिंदुत्व शिवसेनेचा पंचप्राण आहे. बाळासाहेब आत्मा आहे. तो राहील. त्यांनी त्यांचं राजकारण करावं. कुणी कुणाचं बोट पकडून राजकारण करत असेल तर खुशाल करावं. दुसरे बेगडी धर्मनिरपेक्षतावादी आहे का? हे सांगायची गरज नाही. तुमचं राजकारण बेगडी आहे त्याचं काय. जसे बेगडी धर्मनिरपेक्षतावादी आहेत, तसेच बेगडी हिंदुत्ववादी आहेत. त्यांच्या आड तुम्ही जात आहात ते लोकांना माहीत आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्ला चढवला. राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे जुने व्हिडीओ ट्विट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यावरही राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. बाळासाहेबांचे जुने काय प्राचीन व्हिडीओ टाकले तरी त्यांनी आम्हाला बाळासाहेब शिकवू नये. त्यांनी पुन्हा पुन्हा बाळासाहेब तपासले पाहिजे. शिवसेनेचा आणि शिवसेनाप्रमुखांचा इतिहास सांगायला आम्ही काही खाली बसलो नाही. आजही आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चाललो आहोत. आमचा श्वास बाळासाहेब आहे. आम्हाला काय सांगता? बाळासाहेबांनी भोंग्याबाबत, नमाजबाबत भूमिका घेतली. त्यांनी नमाजावर तोडगा दिला. भोंगे उतरवा बाळासाहेब सांगत होते. ते बंद झाले. कोर्टाने हस्तक्षेप केला आणि देशात एकच कायदा तयार झाला. हा इतिहास समजत नसेल तर त्यांनी बाळासाहेब समजून घ्यावे. त्याविषयीच्या बाळासाहेबांच्या कॅसेट त्यांना पाठवून देऊ, असा चिमटाही राऊत यांनी काढला.
तुमचे जे मास्तर आहेत त्यांची डिग्री समजून घ्या. ते तुम्हाला हिंदुत्वाचे धडे देत आहेत. त्यांची डिग्री बोगस आहे का? हे समजून घ्या. ते तुम्हाला चुकीचे हिंदुत्वाचे धडे देत आहेत. शिवसेनेला कुणीही चुकीचे धडे देऊ नये. आम्हाला अनेक ट्रस्टने कळवलं, साहेब आमच्याकडे गावात दुसरं साधन नाही. नाटक, सिनेमा ही आमची संस्कृती नाही. आम्ही कीर्तनात मग्न असतो. याला फटका देणार आहात का? नियमानुसार वागा. कुणी अल्टिमेटम देतोय म्हणून सरकार चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
नवनीत राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. राज ठाकरेंवर हाच गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यावरही राऊत यांनी भाष्य केलं. हा विषय गृहमंत्रालयाचा आहे. त्यावर मी बोलणार नाही. सरकार निर्णय घेईल. ज्यांनी महाराष्ट्राबाबत कारस्थान केलं त्यांना तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. नवनीत राणा आणि राज ठाकरे यांची तुलना करू नका. सरकार सरकारचं काम करत असतं, असंही त्यांनी सांगितलं.