काल काय झालं, आज काय झालं ते सोडा, मोदी सरकारने भविष्याविषयी बोलावे: संजय राऊत
शेतकऱ्यांच्या आजवरच्या विकासाचे श्रेय एका राजकीय पक्षाला देऊन चालणार नाही, असे संजय राऊत यांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला. | Sanjay Raut
मुंबई: संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळाला नाही. याउलट गेल्या पाच वर्षांमध्ये भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाव्याची शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चिरफाड केली. भारत हा गेल्या 70 वर्षांपासून कृषीप्रधान देश असल्याचा डंका पिटला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विकासाचे श्रेय नेमके कोणत्या राजकीय पक्षाला द्यायचे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
अमित शहा शेतकऱ्यांचा विकास झाला आहे, असे म्हणत असतील तर ते खरंच असणार. गेल्या पाच वर्षातच शेतकऱ्यांचा फायदा झाला, असं अमित शहा म्हणत असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मात्र, यापूर्वी शरद पवार यांनी 10 वर्ष कृषीमंत्री म्हणून काम केले आहे. अटलबिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई, व्ही.पी. सिंह आणि लालबहादूर शास्त्री यासारख्या नेत्यांनी देशाचा कारभार सांभाळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आजवरच्या विकासाचे श्रेय एका राजकीय पक्षाला देऊन चालणार नाही, असे संजय राऊत यांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला.
‘शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला एकच राजकीय पक्ष जबाबदार नाही’
शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती अगदीच हालाखीची आहे, असे मी म्हणणार नाही. त्यासाठी मी कोणत्याही एका पक्षाला जबाबदारी धरणार नाही. आजवर प्रत्येक सरकारने कायम शेतकऱ्यांच्या हिताचीच भूमिका घेतली आहे. पंडित नेहरू ते इंदिरा गांधी यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्याने राष्ट्रहिताचीच भूमिका घेतली, असे संजय राऊत यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या पॅकेजवर राऊत काय म्हणाले?
आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकत होतो. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत आहे. पण पंजाबचा शेतकरी गेल्या 30 दिवसांपासून थंडी असून दिल्लीत आंदोलन करत आहे. या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. काल काय झालं, आज काय झालं याविषयी बोलण्यात अर्थ नाही. काल त्यांनी काम केलं नाही म्हणूनच तुम्ही सरकारमध्ये आहात म्हणून आता तुम्ही भविष्याविषयी बोला, असे संजय राऊत यांनी म्हटले.
‘फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना अजूनही बैलगाडीची आठवण येते ही चांगली गोष्ट’
देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना आधुनिक जगात अजूनही बैलगाडीची आठवण येते ही चांगली गोष्ट आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. विरोधकांच्या बोलण्याने महाविकास आघाडी सरकार आणखी मजबूत होत असल्याचे राऊत यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
Farmer Protest : मोदींच्या आवाहनानंतर शेतकऱ्यांनी बैठक बोलावली, पुढील रणनीती ठरवणार
…नाहीतर जमिनीत 10 फूट गाडू : शिवराज सिंह चौहान
केरळमध्ये एपीएमसी नाही, मग दिल्लीत फोटो काढण्यापेक्षा तिथे आंदोलन का करत नाही?; पंतप्रधानांचा सवाल