Sanjay Raut : कोयता गँग आणि त्यांचे सूत्रधार मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर; संजय राऊत यांची घणाघाती हल्ला
खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली. कोयता गँग आणि त्यांचे सूत्रधार मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर पण सडकून टीका केली.
खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कोयता गँग आणि त्यांचे सूत्रधार मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असल्याचा घणाघात त्यांनी केला. राज्य सरकार सध्या गुंडांच्या हातात असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. राज्यातील सीबीआय आणि ईडीचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या शब्दांना आता धार आली आहे.
लोकसभेसाठी गुंडांचा वापर
कोयता गँगचे सूत्रधार सरकारमध्ये बसलेले आहेत. कोयता गँग काय आहे या राज्यातील कायदा व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. कारण सरकार गुंडांच्या हातामध्ये आहे, गुंडांना पोसणाऱ्यांचे आता सरकार आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून निवडणुका लढवण्यासाठी, जिंकण्यासाठी तुरुंगातून गुंडांना बाहेर काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीत गुंडांचा वापर करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. कोयता गँग आणि त्यांचे सूत्रधार मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असल्याचा घणाघात त्यांनी केला.
सीबीआय, ईडीचा गैरवापर
अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अजूनही आहेत. त्यांना मुख्यमंत्री असताना अटक केले. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही, कारण लोकांचा कौल त्यांच्याबाजूने होता. मुख्यमंत्री म्हणून त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. अरविंद केजरीवाल ,झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ,दिल्लीचे आणखी दोन-तीन मंत्री आहेत. राज्यातही खोट्या प्रकरणांमध्ये ईडी आणि सीबीआयने अनेकांना अडकवलं असल्याचा आरोप त्यांनी केला.
देशात डोंबाऱ्याचा खेळ
या सगळ्यांना अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेने चपराक मिळाली आहे. अरविंद केजरीवाल यांच्याकडे विधानसभेत पूर्ण बहुमत आहे. केजरीवाल यांचा दोष इतकाच की देशाच्या राजधानी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा वारंवार पराभव केला. त्यांना यश मिळू दिले नाही. त्याच्यामुळे काही खोट्या प्रकरणाची उभारणी करून त्यांना अटक केली. जसं मला अटक केली आणि देशमुख यांना अटक केली खोट्या प्रकरणात गेल्या काही वर्षांमध्ये या देशांमध्ये लोकशाहीत एक डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे. या खेळात ईडी, सीबीआय आणि पोलिसांचा वापर सुरु आहे.