राज ठाकरे यांची मुलगीही ट्रोल?, युट्यूबवर नको ते मेसेज; शर्मिला ठाकरे काय म्हणाल्या?
शर्मिला ठाकरे यांनी जैन तेरापंथ समाजाचे राष्ट्रीय संत आचार्य श्री महाश्रमजी यांचं दर्शन घेतलं. जैन समाजाचे प्रमुख पदाधीकारी मनोहर गोखरू, भूपेश कोठारी, ललित जैन आणि दीपक संदाडिया यांनी शिवतीर्थ येथे भेट घेउन राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांना राष्ट्रीय संतांना भेटण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी आचार्यजींचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी मीडियाशी संवादही साधला.
ब्रिजभान जैस्वार, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 10 डिसेंबर 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलीलाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीच ही माहिती दिली आहे. डीपफेक व्हिडीओ आणि सोशल मीडियावरून येणाऱ्या कमेंट्सवर बोलताना शर्मिला ठाकरे यांनी ही माहिती दिली. तसेच देशातील ब्रिटिशकालीन कायदे तकलादू असून हे कायदे बदलले पाहिजे, अशी मागणीही शर्मिला ठाकरे यांनी केली आहे. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
शर्मिला ठाकरे यांनी जैन तेरापंथ समाजाचे राष्ट्रीय संत आचार्य श्री महाश्रमजी यांचं दर्शन घेतलं. जैन समाजाचे प्रमुख पदाधीकारी मनोहर गोखरू, भूपेश कोठारी, ललित जैन आणि दीपक संदाडिया यांनी शिवतीर्थ येथे भेट घेउन राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांना राष्ट्रीय संतांना भेटण्याचं आमंत्रण दिलं होतं. या विनंतीला मान देऊन शर्मिला ठाकरे यांनी सांताक्रूझच्या एसएनडीटी महाविद्यालयात येवून आचार्य श्री महाश्रमजी यांचं दर्शन घेतलं. त्यावेळी शर्मिला ठाकरे बोलत होत्या.
माझ्यावर विश्वास ठेवा. मीही त्यातूनच जाते. माझ्या मुलीला युट्यूबवर कोण कोण लोकं वाट्टेल तसे मेसेज टाकत असतात. मी पोलीस आयुक्तांना अनेकदा तक्रार केली. त्यांनी आरोपींना अटकही केली. पण नंतर त्यांना सोडावं लागतं. या प्रकाराला चाप बसण्यासाठी कायद्यात बदल करायला हवं. विधानसभेने पर्याय काढावा. आपले कायदे ब्रिटिशकालीन आहे. ते तकलादू आहेत, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
साधू संतांचे आशीर्वाद घेणं चांगलं
राज ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं. पण ते पुण्यात असल्यामुळे येऊ शकले नाहीत. आज साहेब पुण्यात असल्यामुळे मी आले. साधूसंतांचे आशीर्वाद घेणं कधीही चांगलं असतं, असं सांगतानाच आचार्यजी आमच्या घरी आले तर आमचे भाग्यच असेल, असंही त्या म्हणाल्या.
राजकीय प्रश्न साहेबांना विचारा
यावेळी त्यांना भाजपच्या देशभक्तीवर विचारण्यात आलं. त्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. राजकीय प्रश्न राज साहेबांना विचारा, असं त्या म्हणाल्या.