‘त्या’ व्हिडीओवर शीतल म्हात्रे संतप्त; म्हणाल्या, जेव्हा काहीच सूचत नाही, तेव्हा स्त्रीच्या चारित्र्यावर…
इतक्या खालच्या पातळीचे विचार कुणी करू शकतं? एखाद्या स्त्रीला घरंदाज स्त्रीला अशा पद्धतीनं बोलणं आणि व्हिडीओ टाकणं वेदना देणारं आहे. करणारे कोण आहेत. सर्वांना माहीत आहे.
मुंबई : शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप पसरला आहे. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जेव्हा काहीच सूचत नाही तेव्हा स्त्रीयांच्या चारित्र्यावर बोललं जातं. तिला कमी लेखून तिचं राजकारणात खच्चीकरण केलं जातं. राजकारणात मला यापूर्वीही असे अनुभव आले आहेत. आताच्या प्रकारामागे कोण आहेत याचा आणि त्याच्यामागच्या डोक्याचा पोलीस शोध घेतीलच, असं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.
शीतल म्हात्रे यांनी फेसबुकवर एका व्हिडीओच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच या घटनेचा निषेधही नोंदवला आहे. एक महिला जेव्हा राजकारणात काम करत असते तेव्हा तिला अनेक गोष्टींना सामोरे जावं लागत असते. मी जेव्हा राजकारणात काम करत होते. तेव्हा काही वर्षापूर्वी मला राजकारणात वाईट अनुभव आले. पुरुषी जो विचार असतो तो कसा असतो, एखादा पुरुष राजकारणी स्त्रीला कसा वागवतो, याचा मला अनुभव आला.
माझ्या आत्मसन्मानासाठी मी माझा जीव आणि करिअर सर्व पणाला लावलं. आज त्याच स्त्रीबद्दल बोलण्यासाठी काहीच नसेल, ती ज्या पद्धतीने काम करते ते कुठं तरी खटकत असतं. एखादी स्त्री एवढ्या चांगल्या प्रकारे कसे काम करू शकते? याचा प्रश्न काही लोकांना पडतो. मग तिला अडकवण्यासाठी वेगवेगळे विचार सुरू होतात. काहीच सूचलं नाही तर मग तिच्या चारित्र्यावर बोलणं अतिशय सोपं असतं. तेच विरोधक करत आहेत, अशी संतप्त भावना शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.
पायाखालची वाळू सरकली
इतक्या खालच्या पातळीचे विचार कुणी करू शकतं? एखाद्या स्त्रीला घरंदाज स्त्रीला अशा पद्धतीनं बोलणं आणि व्हिडीओ टाकणं वेदना देणारं आहे. करणारे कोण आहेत. सर्वांना माहीत आहे. विरोधक खालच्या पातळीवर जाऊ शकतात. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात स्त्रीला बदनाम करू शकतात. भावा बहिणीचं नातं असलेल्या अशा एखाद्या स्त्रीला आणि पुरुषाला समाज विकृत नजरेने बघतो.
याच्या मागे कुणाचं डोकं आहे आणि कोण आहे हे आम्हाला माहीत आहे. कारण त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते या पातळीवर आले आहे. पोलीस याचा योग्य तो तपास करतीलच. संबंधित व्यक्ती आणि त्याच्या मागच्या डोक्याचा पोलीस शोध घेतीलच. एखाद्या स्त्रीबद्दल बोलणं हे महाराष्ट्राच्या आणि बाळासाहेबांच्या विचारांना आणि संस्कारांना शोभत नाही, अशा शब्दात म्हात्रे यांनी खोडसाळपणा करणाऱ्यांना झापलं आहे.
गुन्हा दाखल
अतिशय विकृत पध्दतीने माझी बदनामी करण्याकरिता समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ बनवणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या व्यक्तींविरोधात तसेच मातोश्री या FB पेज विरोधात दहिसर पोलिस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रसंगी माझ्या समवेत महिला विभागप्रमुख मीनाताई पानमंद, युवासेना कार्यकारिणी सदस्य राज प्रकाश सुर्वे, गौरी खानविलकर, अलका सापळे, अंजली जठार, राम यादव, कमलेश तांडेल, नीलम परब, दर्शना सावंत, रेखा यादव, जीतू म्हात्रे आणि मोठ्या संख्येने उपस्थि होत्या.