शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पुन्हा नाराजीच्या चर्चा, मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या आमदाराची थेट सुरक्षाच काढली?
शिंदे गटातील (Eknath Shinde Group) आणखी एक आमदार नाराज असल्याची माहिती समोर आलीय. यावेळी कारण थोडसं वेगळं आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांमध्ये धुसफूस असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. कारण शिंदे गटातील (Shinde Group) आमदार नाराज असल्याच्या चर्चा वारंवार समोर येत आहेत. कधी मंत्रिमंडळ विस्तारावरुन युतीत सारं काही आलबेल नसल्याची ओझरती बातमी समोर येते. तर कधी प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) उघडपणे प्रसारमाध्यमांसमोर येऊन मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून नाराजी व्यक्त करतात. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारावरुन इतर आमदारांमध्येही नाराजी असल्याची माहिती ते स्वत: देतात. दुसरीकडे विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत (MLC Election 2023) शिंदे गटाचा एकही उमेदवार जाहीर करण्यात न आल्याने शिंदे गटात नाराजीचा सूर उमटत असल्याची माहिती समोर आलीय. हेही असे की थोडे आता शिंदे गटातील आणखी एक आमदार नाराज असल्याची माहिती समोर आलीय. पण यावेळी कारण थोडसं वेगळं आहे.
शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांची गेल्या तीन दिवसांपासून सुरक्षा काढण्यात आल्याने ते नाराज असल्याची माहिती समोर आलीय. संजय शिरसाट यांनी स्वत: ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना याबाबत माहिती दिलीय. तसेच आपल्या जीवाला धोका उद्भवल्यास त्याला पोलीस जबाबदार राहतील, असा इशाराच संजय शिरसाट यांनी दिलाय.
संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
“माझी सुरक्षा तीन दिवसांपासून काढली गेलीय. मला सांगण्यात आलंय की, तुम्हाला जीप उपलब्ध होत नाहीय. म्हणून अशावेळेला जर एखादी घटना घडली तर त्याचा निश्चितच फायदा हा दुसरे घेत असतात. त्यामुळे या घातपाताच्या घटनांची चौकशी व्हायला पाहिजे”, असं संजय शिरसाट म्हणाले.
“मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलेन. हे अशा पद्धतीने झालं आणि त्याचे काही दुष्परिणाम झाला तर…, खरंत होऊ नये. पण तसा दुष्परिणाम झाला तर निश्चितच पोलिसांची जबाबदारी असेल”, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतील?
संजय शिरसाट यांची याआधीदेखील नाराजी समोर आलीय. पण त्या नाराजीमागचं कारण वेगळं होतं. शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झालेला नाही. सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले तरी राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झालेला नाही, यावरुन शिरसाट नाराज असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. अर्थात फक्त संजय शिरसाट यांचीच तशी नाराजी आहे, असं नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे संजय शिरसाट यांची सुरक्षा काढण्यात आलीय. आपल्याला पुन्हा सुरक्षा द्यावी, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या या मागणीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.