Shiv Sena: शिवसेना नव्या जायंट किलरच्या शोधात?, ही आहे यादी, आणखीही काही नावे संपर्कात.
या सगळ्या संकटाच्या काळातच स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. मुंबईसह राज्यभरातील महत्त्वाच्या महापालिकांत शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजपा आणि शिंदे गट एकत्रित मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही भाजपासोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. अशा स्थितीत शिवसेनेला नव्या नेत्यांची गरज आहे.
मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)गटाच्या बंडानंतर शिवसेना पिछाडीवर पडल्याचे दिसते आहे. शिवसेनेची (Shiv Sena) मुलुखमैदानी तोफ संजय राऊत हे सध्या तुरुंगात आहेत. राज्यात शिवसेनेच्या पक्षबांधणीसाठी आदित्य ठाकरे फिरत आहेत. आगामी काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हेही राज्याच्या दौरा करणार आहेत.
या सगळ्या संकटाच्या काळातच स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. मुंबईसह राज्यभरातील महत्त्वाच्या महापालिकांत शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजपा आणि शिंदे गट एकत्रित मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही भाजपासोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. अशा स्थितीत शिवसेनेला नव्या नेत्यांची गरज आहे.
राज्यात ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेने नेतेमंडळी गमावली आहेत, त्या ठिकाणी शिवसेना नवे नेते किंवा जायंट किलर पक्षात कसे येतील यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहेत. संभाजी बिर्गेडसोबत युती करणे यामागेही हीच धारणा असल्याचे सांगण्यात येते आहे.
हे आहेत सध्याचे शिवसेनेचे जायंट किलर
1. संभाजी ब्रिगेड
संभाजी ब्रिगेडशी युती करुन शिवसेनेने राज्यात आगामी काळात शिवसेना मराठा राजकारणात मागे नसेल हे दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा नेते आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या दोन सरकारच्या कालखंडात महत्त्वाचा ठरलेला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो.
अशा स्थितीत मराठा नेता मुख्यमंत्री करुन भाजपाने काँग्रेस-राष्ट्रवादीला चेकमेट देण्याचा प्रयत्न केल्याचे मानण्यात येते आहे. आता शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडशी युती केल्याने आगामी काळात हिंदुत्वाबरोबरच आक्रमक मराठा हाही शिवसेनेचा अजेंडा असू शकतो.
2. ठाण्यात केदार दिघे यांना बळ
धर्मवीर आनंद दिघे यांच्या राजकारणात मोठे झालेले आणि ठाण्यातील शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले. मात्र आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे यांना शिवसेनेनं ठाणे जिल्हाप्रमुखपद देत त्यांच्या पाठिशी शिवसेनेचं बळ देण्याचा प्रय्तन केला आहे. आगामी काळात ठाण्यात केदार दिघे हे शिवसेनेसाठी जायंट किलर ठरमार का हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
3. अंबादास दानवे यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद
एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा सर्वाधिक मोठा फटका बसला आहे तो मराठवाड्यात. तिथे शिवसेनेची ताकद चांगलीच कमी झाली आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात तीन मंत्री शिंदे-भाजपा गटाला द्यावी लागली आहेत. तरीही संजय शिरसाट यांच्यासारखा नेता अद्यापही नाराज असल्याचे मानण्यात येते आहे.
अशा स्थितीत औंरागाबादमध्ये शिवसेनला बळ देण्यासाठी अंबादास दानवे यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेने दिले आहे. त्यासाठी मविआत काँग्रेसचा रोषही शिवसेनेने ओढवून घेतला आहे. तिथे दानवे यांना बळ देत त्यांना आगामी काळात ही जायंट किलरची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
4. कोकणात भास्कर जाधव, वैभव नाईक यांना बळ
रायगड आणि रत्नादिरी जिल्ह्यातील आमदार उदय सामंत आणि भरत गोगावले हे शिंदे गटात गेल्याने कोकणासारख्या शिवसेनेसाठी महत्त्वाच्या मतदारसंघात तळकोकणात वैभव नाईक तर चिपळूणात भास्कर जाधव यांना जायंट किलर करण्याच्या प्रयत्नात शिवसेना आहे. त्यासाठीच शिवसेना नेतेपदी भास्कर जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
5. पुण्याची जबाबदारी सचिन अहिर यांच्याकडे
पुणे शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे हे शिंदे गटासोबत गेले आहेत. अशा स्थितीत पुणे जिल्ह्याची जबाबदारी वरळीतील शिवसेनेचे विश्वासू नेते सचिन अहिर यांच्याकडे देण्यात आली आहे. तर सहसंपर्कप्रमुखपदी आदित्य शिरोडकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
6. जळगावची जबाबदारी गुलाबराव वाघ यांच्याकडे
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जे आधी शिवसेनेत होते, ते आता शिंदे गटात आले आहेत. शिवसेनेचे जिल्ह्याध्यक्ष गुलाबराव वाघ यांना गुलाबराव पाटील यांच्यासाठी जाएंट किलर म्हणून पाहिलं जात आहे. सतत गुलाबराव पाटील यांना साथ देणारे गुलाबराव वाघ हेच आता त्यांचे जाएंट किलर ठरतील किंवा नाही हे निवडणुकीच्या मैदानातच समजणार आहे.