Maharashtra Cabinet Expansion | राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणखी रखडणार की जाहीर होणार? पाहा संजय शिरसाट काय म्हणाले
राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराबाबत वारंवार वेगवेगळ्या चर्चांना उधाण येत आहे. हा विस्तार गेल्या वर्षभरापासून रखडलेला आहे. अनेकदा अशा घडामोडी घडायला लागतात की विस्ताराची घोषणा होऊ शकते, असं वाटायला लागतं. पण नंतर त्याच घटना तिथेच स्तब्धपणे थांबतात.
मुंबई | 21 सप्टेंबर 2023 : राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार कधी होईल? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो. मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त सातत्याने टळताना दिसतोय. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्ताराच्या घडामोडींना वेग आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्या काळात बरेच दिल्ली दौरे देखील झाले होते. विशेष म्हणजे मंत्रिमंडळाच्या विस्तारातील नव्या मंत्र्यांची नावे देखील चर्चेत आले होते. पण आमदारांमध्ये नाराजी वाढेल म्हणून पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती समोर आली होती.
विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन संपुन आता बरेच दिवस लोटले आहेत. पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. विशेष म्हणजे दरम्यानच्या काळात विरोधात असलेले अजित पवार हे सत्तेतही सहभागी झाले आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना आमदारांमध्ये धुसफूस सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सहभागी झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची संख्या अर्थात कमी झाली. त्यामुळे आता मंत्रीपद कुणाला मिळेल? याबाबत उत्सुकता वाढली आहे.
संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार कधी होईल, याबाबत शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीय. “येणारी लोकसभा ही भाजप पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी भाजप पक्ष पूर्ण ताकदीने कार्यक्रमाला लागलेला आहे. त्यामुळे सर्व आमदारांना लोकसभेच्या तयारीला लागा, अशा सूचना दिल्या आहेत. याचा अर्थ असा होत नाही की विस्तार होणार नाही. पण लोकसभा हे टार्गेट ठेवा, असं सांगण्यात आलं असावं”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
“मंत्रिमंडळ विस्तार होईल की नाही याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. विस्तार करावा लागेल पण याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील”, असंही संजय शिरसाट म्हणाले आहेत.त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, पण तो कधी होईल, याबाबत संजय शिरसाट आणि इतर आमदारांनादेखील अद्याप माहिती नसल्याचं चित्र आहे.