Aditya Thackeray : आरे बचावासाठी शिवसेनेचा लढा, आदित्य ठाकरे म्हणतात, मुंबईच्या फुफ्फुसांना धक्का पोहचू देणार नाही
अडीच वर्षांपूर्वी जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा आपण आरे जंगल म्हणून घोषित केलं होतं. कांजूरला कारशेड करणार असा निर्णय घेतला होता. पण हे सरकार आमच्या पाठीत खंजीर खुपसून तयार झाले.
मुंबई : राज्यात आलेल्या नवीन सरकारनं मुंबईचं फुफ्फुस म्हणून ओळख असलेल्या आरे जंगलातच मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात पर्यावरणवाद्यांकडून आरेत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, माजी पर्यावरणमंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी भेट दिली. यावेळी पर्यावरणवाद्यांची भेट घेऊन या आंदोलनाला आमचा भक्कम पाठिंबा असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय. आरे बचावासाठी शिवसेना (Shiv Sena) सदैव लढा देईल. मुंबईच्या फुफ्फुसांना धक्का पोहचू देणार नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईतील मेट्रोच्या वेगवेगळ्या मार्गाचं मेट्रो कारशेड फडणवीस सरकारच्या काळात आरेत उभारण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयाविरोधात पर्यावरणवादी (Environmentalist) आणि मुंबईकरांकडून विरोध होत होता. त्यावेळी शिवसेनेनेदेखील आरेमधील कारशेडला (car shed in Aarey) विरोध करत हा प्रकल्प इतरत्र उभारण्याचा शब्द मुंबईकरांना दिला.
पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केला संताप
उद्धव ठाकरे सरकार येताच हा प्रकल्प आरेमधून हलवून कांजूरमार्ग येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण मध्यवधित आलेल्या नव्या शिंदे सरकारने पुन्हा एकदा कांजूरमधील प्रकल्पाला स्थगिती देत आरेतच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात पुन्हा एकदा पर्यावरणवादी आणि मुंबईकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आंदोलन करण्यात येत आहे. आज आरेत सुरू असलेल्या या आंदोलनाला युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
आदित्य ठाकरेंचा आरेतील कारशेड उभारणीला विरोध
अडीच वर्षांपूर्वी जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा आपण आरे जंगल म्हणून घोषित केलं होतं. कांजूरला कारशेड करणार असा निर्णय घेतला होता. पण हे सरकार आमच्या पाठीत खंजीर खुपसून तयार झाले. आता आरेत पुन्हा कारशेड उभारून मुंबईकरांच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी आरेतील कारशेड उभारणीचा निर्णय घेणाऱ्या सरकारवर तोफ डागली.