काल निवडणुकीत दारूण पराभव; आता पुढे काय? संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा, म्हणाले….
Sanjay Raut on Vidhansabha Election 2024 Result : काल निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर आज सकाळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यात त्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. चंद्रचूड यांच्यावर त्यांनी निशाणा साधलेला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. हा निकाल जनतेच्या मनातला विजय नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष संपवण्यासाठी हा डाव आहे, असं संजय राऊत म्हणाले. जनतेच्या न्यायालयात जायचं आम्ही ठरवलं होतं. पण तिथं देखील न्याय विकत घेण्यात आला. जसा न्यायालयातील न्याय विकत घेतला. तसं जनतेच्या दरबारातील न्याय देखील पैशाने विकत घेण्यात आला. पण आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. आम्ही लढत राहणार आहोत, असं राऊत म्हणालेत.
चंद्रचूड यांच्यावर हल्लाबोल
पहिल्या दोन तासामध्ये जी लढाई बरोबरीत सुरु होती. जसं हरियाणामध्ये झालं. त्यानंतर अचानक पुढच्या दोन तासामध्ये जे निकाल लागले. ते संशयास्पद होते. लोकशाहीमध्ये असं होत नाही. निकाल आधीच ठरवेला होता. फक्त मतदान करू दिलं. या सगळ्याला, महाराष्ट्रातील घडामोडींना जर जबाबदार कुणी असेल. तर ते माजी सरन्यायधीश डी. वाय चंद्रचूड… देशाचं सर्वोच्च न्यायालय ज्याने आमदार अपात्रतेच्या संदर्भात वेळेत निर्णय द्यायला हवा होता. मग तुम्ही कशाकरता बसलेला आहात? अडीच तीन वर्षे तुम्ही निर्णय देत नसाल. तर तुम्ही खुर्च्या कशा करता उबवताय?, अशा शब्दात संजय राऊतांनी चंद्रचूड यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
तर चित्र वेगळं असतं- राऊत
उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या प्रमाणे चंद्रचूड हे प्राध्यापक म्हणून ते भाषणं द्यायला चांगले आहेत. पण सरन्यायाधिश म्हणून घटनात्मक पेचावर ते निर्णय देऊ शकलेले नाहीत. यासाठी इतिहास त्यांना माफ करू शकणार नाही. जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं. आज जे चित्र दिसतंय ते चित्र नक्कीच दिसलं नसतं. त्यांनी निर्णय न दिल्याने पक्षांतराचे दरवाजे ते उघडे ठेवून गेलेले आहेत. आता सुद्धा कुणी कुठे कशाही उड्या मारू शकेल. कारण लोकांना कायद्याची भीती राहिलेली नाही, असं संजय राऊत म्हणाले.