‘त्या’ गोळीबारात क्लिन चिट मिळाल्यानंतर सदा सरवणकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले- ज्या दिवशी गोळीबार…
Sada Sarvankar News | मुंबईत प्रभादेवी परिसरात झालेल्या गोळीबारत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना क्लिन चिट मिळाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
मुंबई : प्रभादेवी (Prabhadevi) गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत झालेला गोळीबार हा सदा सरवणकर (Sada sarvankar) यांनी केलाच नव्हता, अशी क्लिन चिट नुकतीच पोलिसांनी दिली आहे. प्रभादेवीत त्या दिवशी गोळीबार झाला. तो शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याच पिस्तुलातून झाल. मात्र तो गोळीबार सदा सरवणकर यांनी केलाच नसल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. मुंबई पोलिसांच्या तपासात आमदार सरवणकर यांना काल मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर आज सदा सरवणकर यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, हे सरवणकर यांनी सविस्तर सांगितलं.
काय म्हणाले सदा सरवणकर?
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत गणेशाच्या स्वागतासाठी त्या दिवशी ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही बाजूंनी शिवसैनिक उपस्थित होते. त्याच वेळी या दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. मात्र या वादाबद्दल तक्रार कुणी केली माहिती नाही. आम्ही मागील ४० वर्षांपासून एकत्र आहोत. यापैकी काही लोकांना आम्ही घरंही दिली आहेत. त्या दिवशी गोळीबार करणं हा कुणाचा उद्देश नव्हता. कारण आम्ही एका कुटुंबातली लोकं आहोत. या प्रकाराची कुणी तक्रार केली नव्हती. उलट पोलिसांकडूनच सदर तक्रार दाखल करण्यात आली, अशी माहिती सदा सरवणकर यांनी दिली.
ज्या दिवशी गोळीबार….
आमच्या परिसरातील वाद आणखी विकोपाला गेला नाहीये. पण ज्या दिवशी गोळीबार करायची वेळ येईल, त्या दिवशी आधी राजीनामा देऊ, असं वक्तव्य आमदार सदा सरवणकर यांनी केलंय.
गोळी त्यांचीच, मग गोळीबार कुणी केला?
प्रभादेवी परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या राड्यात नेमका गोळीबार कुणी केला, याचं उत्तर अद्याप मुंबई पोलिसांना सापडलेलं नाहीये. शिंदे आणि ठाकरे गटाच्या वादात आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात आला आहे. सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी सदा सरवणकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. सरवणकर यांच्याकडील बंदूकदेखील जप्त करण्यात आली होती. या बंदुकीसोबत जिवंत काडतुसं, तसेच घटनास्थळावरून काही नमूने जप्त करण्यात आले होते. बॅलेस्टिक तज्ज्ञांकडूनही चौकशी करण्यात आली होती. तज्ज्ञांच्या अहवालानुसार ती गोळी सदा सरवणकर यांच्या बंदुकीतूनच झाडण्यात आली होती. मात्र त्यांनी गोळीबार केला नाही, असेही पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यानंतर सदा सरवणकर यांनी प्रथमच माध्यमांसमोर प्रतिक्रिया नोंदवली.