Shiv Sena Thackeray Group | ठाकरे गटातील सर्वात मोठी बातमी, लोकसभा निवडणुकीआधी पक्षात मोठ्या हालचाली
शिवसेना ठाकरे गटातील महत्त्वाची बातमी समोर आलीय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी पक्षात घडामोडींना वेग आलाय. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवली जात आहे. तसेच प्रत्येक मतदारसंघासाठी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.

दिनेश दुखंडे, Tv9 मराठी, मुंबई | 7 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. देशात पुढच्यावर्षी लोकसभेच्या निवडणुका असणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचंड हालचाली घडत आहेत. प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. भाजपकडून तर थेट मंत्रीच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपसारखीच आता ठाकरे गटातही अगदी तशीच रणनीती आखली जात आहे. ठाकरे गटात मुंबईतील मतदारसंघांसाठी नेमकी काय रणनीती सुरुय, याबाबत सूत्रांनी अतिशय महत्त्वाची बातमी दिली आहे.
ठाकरे गटाकडून आता राज्यसभेतील खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यासाठी चाचपणी सुरु झालीय. भाजपकडून लोकसभेच्या खासदारांसाठी चाचपणी सुरु झालीय. अगदी तशीच चाचपणी आता शिवसेना ठाकरे गटात सुरु झालीय. ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार अनिल देसाई, संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावाची चाचपणी सुरु झालीय. मुंबईमधून या तिघांना लोकसभा निवडणुकीसाठी उतरवण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.
भाजपसारखीच ठाकरे गटाची रणनीती?
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधित जागांवर निवडून आणण्याचं भाजपचं ध्येय आहे. भाजप आणि महायुतीतील मित्रपक्षांकडून महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागांवर विजय मिळवण्याचा निश्चय करण्यात आलाय. त्यासाठी महायुतीत जोरदार हालचाली घडत आहेत. आता तशाच हालचाली ठाकरे गटात सुरु आहेत.
भाजप या निवडणुकीत आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याच्या तयारीत आहे. तशीच रणनीती आता ठाकरे गटातही आखली जात आहे. ठाकरे गट मुंबईतील 6 पैकी 4 जागांसाठी आग्रही आहे. या 4 जागांपैकी 3 जागांवर ठाकरे गट राज्यसभेचे खासदार उतरवणार आहे. तशी चाचपणी केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
कोणत्या जागेसाठी कोण उमेदवार?
दक्षिण मुंबईत अरविंद सावंत हे खासदार आहेत. त्यांना कदाचित दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात आणलं जाऊ शकतं. अनिल देसाई यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी दिली जाऊ शकते. उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी याआधीच शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांना हिरवा कंदिल दाखवण्यात आलाय. त्यांनी मतदारसंघात कामालाही सुरुवात केलीय. पण पक्षातील काही नेत्यांचा वेगळा मतप्रवाह आहे.
उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्या पद्धतीचा उमेदवार दिला तर चांगली लढत होऊ शकते. राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं नाव यासाठी चर्चेत आहे. त्या राष्ट्रीय स्तरावरच्या चेहरा आहेत. तसेच त्या उत्तर भारतीय देखील आहेत. पण प्रियंका चतुर्वेदी या निवडणुकीसाठी फार उत्सुक नाहीत, अशी माहिती मिळत आहे.
ईशान्य मुंबईमध्ये खासदार संजय राऊत यांच्या नावाची चर्चा आहे. पण संजय राऊत यांचं म्हणणं आहे की, इंडिया आणि महाविकास आघाडीची रणनीती आखण्यात आपला समावेश आहे. त्यामुळे एका मतदारसंघात अडकून राहणं शक्य होणार नाही. पण पक्षाचा आदेश असेल तर लोकसभा निवडणूक लढवू, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.