मोठी बातमी : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली
Rashmi Shukla Replacement : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून वारंवार रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली जात होती. असं असतानाच आता रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
राज्यात विधानसभा निवडणूक होत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फोन टॅप केल्याचे आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहेत. विरोधकांकडून वारंवार रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली जात होती. असं असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. त्यांना कोणत्या नव्या ठिकाणी नियुक्त केलं जाणार आहे? याबाबतची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. मात्र रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.
तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पॅनल
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नवी नियुक्ती करण्यात येणार आहे. तीन आयपीएस अधिकाऱ्यांचं पॅनल तयार केलं जाणार आहे. हे पॅनल मुख्य आयुक्तांना अहवाल सादर करणार आहे. तीन अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल मुख्य सचिव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत. रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी असल्याने विधानसभेची निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पडणार नाहीत, असं महाविकास आघाडीतील नेत्यांकडून वारंवार म्हटलं जात होतं. असं असतानाच आता रश्मी शुक्ला यांची बदली केली गेली आहे.
शुक्ला यांच्यावर आरोप काय?
1988 च्या बॅचच्या रश्मी शुक्ला या आयपीएस आहेत. महाराष्ट्रातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीत रश्मी शुक्ला यांचं नाव वर आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना अनेक नेते आणि मंत्र्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. आताही रश्मी शुक्ला यांच्या कार्यपद्धतीवर विरोधकांनी आक्षेप घेतला. जून 2024 लाच रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ संपत असताना तो जानेवारी 2026 पर्यंत वाढवण्यात आला. ही बढती नियमबाह्य असल्याचं म्हणत नाना पटोले यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या बदलीसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं.
रश्मी शुक्ला यांच्या कार्यपद्धतीवर मविआचा आक्षेप
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी काँग्रेसने केली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्या प्रकरणी गुन्हे दाखल होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली. शुक्ला यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी पटोले यांनी पत्र लिहित निवडणूक आयोगाला केली. शुक्ला या भाजपला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याचा आरोप पटोलेंनी केला होता. संजय राऊत यांनी देखील रश्मी शुक्ला यांच्या बदलीची वारंवार मागणी केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.