तणावाच्या स्थितीत महाराष्ट्राला नवा पोलीस महासंचालक मिळाला!
मुंबई: पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात सध्या तणावाचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नवी नियुक्ती झाली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. राज्याच्या पोलीस प्रमुखांच्या पदाचा भार ते आज संध्याकाळी स्वीकारतील. दुसरीकडे सुबोध कुमार जयस्वाल यांच्या नियुक्तीने रिक्त झालेल्या मुंबई पोलीस आयुक्तपदी […]
मुंबई: पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात सध्या तणावाचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नवी नियुक्ती झाली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. राज्याच्या पोलीस प्रमुखांच्या पदाचा भार ते आज संध्याकाळी स्वीकारतील. दुसरीकडे सुबोध कुमार जयस्वाल यांच्या नियुक्तीने रिक्त झालेल्या मुंबई पोलीस आयुक्तपदी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक संजय बर्वे यांची नियुक्ती झाली आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारने नाकारल्यानंतर, नवे पोलीस महासंचालक कोण याबाबत चर्चा सुरु होती. त्यामध्ये सुबोध कुमार जयस्वाल यांचं नाव आघाडीवर होतं.
पडसलगीकर हे 31 ऑगस्ट 2018 रोजी निवृत्त होणार होते. मात्र, त्यांना सुरुवातीला तीन महिने मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर पुन्हा तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. या दरम्यान, त्यांना देण्यात आलेल्या मुदतवाढी विरोधात आर. आर. त्रिपाठी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावेळी राज्य सरकारने आम्ही पोलीस महासंचालक यांना पूर्ण कालावधी मिळावा म्हणून दोन वर्षे कालावधी देणार असल्याचं प्रतिज्ञापत्र दिल होतं. मात्र, केंद्र सरकारने पडसलगीकर यांना पुन्हा मुदतवाढ देण्यास काही दिवसांपूर्वी नकार दिला. यामुळे पडसलगीकर यांना 28 फेब्रुवारी म्हणजे आज निवृत्त व्हावं लागणार आहे.
कोण आहेत सुबोध कुमार जयस्वाल?
सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ RAW मध्ये काम केलं आहे.
RAW मध्ये त्यांनी 9 वर्षे महत्त्वाची जबाबदारी सांभाळली
सुबोध जयस्वाल यांच्याकडे तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा तपास सोपवण्यात आला होता
सुबोधकुमार हे 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात सहभागी होते.
मुंबई पोलीस दलात त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले आहे.
जुलै 2018 मध्ये सुबोधकुमार यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली.
संबंधित बातमी
पोलीस दलातली मुख्यमंत्र्यांची मोठी बहीण मुंबईची आयुक्त होणार?