सरकारमध्ये फक्त फडणवीसच शहाणे, बाकी सर्व अतिशहाणे, संजय राऊत यांनी कोणाला मारला टोला
Sanjay Raut : ठाकरे गटाने खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला केला. हे सरकार बेकायदेशीर आहे. त्याचे आदेश पाळणे, हे बेकायदेशीर असल्याच्या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आक्रमक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. भाजप आणि शिंदे गट यांच्यांवर सतत टीका आणि आरोप ते करतात. रोज सकाळी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. नुकतेच नाशिकमधील एका पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांचा आदेश पाळू नका, असे आवाहन संजय राऊत यांनी केले होते. त्यामुळे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊत अधिक आक्रमक झाले. सरकारमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस शहाणे आहेत बाकी सर्व अतिशहाणे किंवा मुर्ख आहे, असा टोला त्यांनी लगावला.
काय म्हणाले संजय राऊत
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे सरकार घटनाबाह्य आहे, हे स्पष्ट झाले आहे. यामुळेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे सरकार बेकायदेशीर आहे, हे वक्तव्य मी केले. बेकायदेशीर सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळणे हा गुन्हा आहे. परंतु हे बोलल्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सरकार बोलण्याचा हक्का हिरावून घेतोय, असा आरोप संजय राऊत यांनी केला. बेकायदेशीर अधिकाऱ्याचे निर्णय पाळताना अधिकाऱ्यांनी सावध राहिले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटलेय.
फडणवीस यांच्यांवर उपरोधीक टोला
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाच्या सर्व आशा संपल्या आहेत. त्यानंतर ठाकरे गट ते मान्य करत नाही. कारण त्यांना त्यांच्या लोकांना संदेश द्यायचा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सरकारमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस शहाणे आहेत. बाकी सर्व अतीशहाणे किंवा मुर्ख आहेत. कारण फडणवीस यांना राजकारण माहीत आहे. त्यांना कायदा माहिती आहे. त्यांना प्रशासन माहीत आहे. ते सर्वांच्या संपर्कात आहेत. त्यानंतर त्यांनी असे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्यांवर दिल्लीतून दबाब आहे, हे स्पष्ट आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाने पोपट मेल्याविषयी म्हटले आहे. आता फक्त विधानसभा अध्यक्षांना ते जाहीर करायचे आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लवकर निर्णय द्यावा, असे ते म्हणाले.