उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का?; ‘हा’ खासदार भाजपच्या वाटेवर
लोकसभा निवडणुकीसाठी आता सत्ताधारी आणि विरोधक आपली संपूर्ण ताकद लावत असलेले पाहायला मिळाले आहेत. भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी इंडिया आघाडीने मास्टरप्लॅन केला आहे. अशातच या निवडणुकाआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
दिनेश दुखंडे, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील खासदार भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना ठाकरे गटाचा एक खासदार सोडचिठ्ठी देणार असल्याचं समजत आहे.
ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का?
ठाकरे गटातील खासदार कलाबेन डेलकर भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती समजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली भेट अत्यंत सकारात्मक झाली. मात्र डेलकर कुटुंब कार्यकर्त्यांशी संवाद साधून अंतिम निर्णय घेणार आहे. कलाबेन डेलकर यांच्या जाण्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो.
कलाबेन डेलकर स्व. खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी आहेत. मोहन डेलकर यांनी 2021 साली मुंबईतील नरिमन पाँईट येथील सी ग्रीन हॉटेल मध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. स्थानिक प्रशासनाला डेलकर यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार धरलं होतं. मोहल डेलकर यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकीमध्ये कलाबेन डेलकर यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली होती.
दरम्यान, पोटनिवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव करत कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवला होता. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कलाबेन डेलकर यांच्या निवडणुकीचा प्रचार केला होता. या निवडणुकीमध्ये कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवत महाराष्ट्राबाहेर निवडून येणाऱ्या पहिल्या शिवसेना खासदार ठरल्या होत्या.