जितेंद्र आव्हाड यांचं प्रभूरामांबद्दल पुन्हा नवं विधान; म्हणाले, प्रभूराम क्षत्रियच…
NCP Leader Jitendra Awhad Statement About Prabhu Shreeram : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबाबत केलेलं वक्तव्य ताजं असतानाच त्यांना आता पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांबाबत विधान केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य पुन्हा चर्चेत आहे. जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले? वाचा...
सुनील ढगे, प्रतिनिधी-टीव्ही 9 मराठी, नागपूर | 16 जानेवारी 2024 : काही दिवसांआधी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबाबत एक विधान केलं होतं. प्रभू राम मांसाहारी असल्याचं आव्हाड म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यांनी यावर स्पष्टीकरणही दिलं होतं. अभ्यासाशिवाय मी बोलत नाही, असं आव्हाड त्यावेळी म्हणाले होते. हा वाद मिटतो ना मिटतो तोवरच आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबाबत विधान केलं आहे. प्रभू श्रीराम हे क्षत्रियच असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
आव्हाड यांचं आजचं विधान काय?
राम बहुजनच आहेत. राम क्षत्रिय आहेत. त्यांनी सांगावं की राम क्षत्रिय नव्हता. राम क्षत्रिय आहे, म्हणजेच तो बहुजन झाला आणि देशात बहुजनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे राम आमचाच आहे. असं काही लोकांनी म्हणणं चुकीचं आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
“होय, आम्ही मटण खातो”
आम्ही बहुजन आहोत. मी तेव्हा बोललो आम्ही मटण खातो. रामाबद्दलच्या माझ्या वक्तव्याबद्दल मी खेद ही व्यक्त केला आहे. नंतर आजवर मी काहीच बोललो नाही. जर मटण खाणाऱ्या माणसाला तुम्ही शेण खातो असं म्हणणार असाल. तर देशातील 80 टक्के लोक शेणच खातात! तुमच्यातले अनेक लोक मटण खातात म्हणजे ते शेण खातात… शेण आणि मटण असं जर तुम्ही बोलणार असाल तर कधी कधी तुम्ही खाता मटण म्हणजे शेण…, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
आव्हाडांचा भाजपवर निशाणा
निवडणुकीपूर्वी रामाचे नावाने वातावरण निर्मितीचे नियोजन होतं. त्यामुळेच 22 जानेवारीची तारीख निवडली गेली. 22 जानेवारी या तारखेचा आणि रामाचा काही संबंध आहे का? रामाचा काही वेगळा दिवस आहे का? काही नाही. वास्तू अपूर्ण असताना, त्यात प्राणप्रतिष्ठा करू नये. असं शंकराचार्य सांगत असताना, त्यांना वेड्यात काढलं जात आहे. भाजपवाल्यांचं कॅलेंडर हे वेगळं आहे. त्यांचे पंचांगही वेगळं आहे. आता तेच पंचांगकर्ते झाले आहेत, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.