मुंबईत ऐन थंडीत बेघरांचे हाल, पोलीसांची अमानूष कारवाई
बेघर नागरिकांवरील कारवाई थांबवण्यासाठी आपण पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन निवेदन दिलेले असे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटले आहे. पुरेशी निवारा केंद्र उभारली जाईपर्यंत कारवाई थांबवावी अशी त्यांची मागणी आहे.
मुंबई : मुंबईत विशेषत: दक्षिण मुंबईत पोलीसांनी गेले काही दिवस रस्त्याच्याकडेला राहणाऱ्या गरीबांविरोधात पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. ऐन थंडीत ही कारवाई सुरू असून ती करताना न्यायालयाच्या निर्देशांना हरताळ फासला जात असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटले आहे. पावसात किंवा थंडीत कारवाई न करण्याचे राज्य सरकारचे आदेश असतानाही त्यास न जुमानता पोलीसांनी दंडुका दाखविल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबई पोलिसांनी मुंबईत रस्त्यावर फिरणाऱ्या तसेच भिक मागणाऱ्या भिक्षेकऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. मुंबईत स्वतःचे घर नसलेले ५० हजारांहून अधिक बेघर नागरिक रस्ते, पदपथ, रेल्वे स्थानक, उड्डाणपूल, मोकळ्या जागा अशा विविध ठिकाणी वास्तव्य करतात. यात काही कुटुंबे आहेत. काही एकटे राहणारे नागरिक तसेच वयोवृद्ध स्त्री-पुरूष, तरूण मुले आणि मुली अशा विविध प्रकारचे लोक वर्षानुवर्षे मुंबईत बेघर म्हणून राहत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून दक्षिण मुंबईतील बेघर नागरिकांवर अमानुष पद्धतीने कारवाई केली जाते आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्नी रोड येथील स. का. पाटील उद्यान पदपथ, ऑपेरा हाऊस, आझाद मैदान, लोकमान्य टिळक मार्ग, व्ही. पी. रोड, डी बी मार्ग, दवा बाजार या परिसरात पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येते आहे.
थंडी पावसात बेघरांवर कारवाई न करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे. मुंबईत 125 रात्र निवाराकेंद्र बांधण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही मुंबई पोलिस यंत्रणा बेघरांचे हाल करत आदेशांचे उल्लंघन करत आहे. याबाबत पोलीस उप आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची चौकशी करीत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्तांकडे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.
संध्याकाळी आणि रात्रीच्या अंधारात अचानक पोलिसांचा ताफा येतो. झोपलेल्या बेघरांना उठवून हाकलतो. विरोध करतील त्यांना काठ्यांनी बडवले जाते आहे. काही ठिकाणी प्लास्टिक, पुठ्ठ्यांचे छप्पर बांधण्यात आले होते. ते या कारवाईतून तोडूमोडून टाकण्यात आले आहेत. बेघरांचे कपडे, अन्नधान्य, मुलांची शाळांची दप्तरे जप्त करण्यात आली. कहर म्हणजे स. का. पाटील उद्यानाजवळ झालेल्या कारवाईत टँकरने पदपथावर पाणी ओतण्यात आले. कारवाईनंतर या नागरिकांनी पुन्हा त्या ठिकाणी राहू नये, यासाठी हा माणूसकी शून्य प्रकार पोलिसांनी केल्याचा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे.
राज्य सरकारने थंडीमध्ये बेघर नागरिकांवर कारवाई करू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. 24 डिसेंबर 2021 रोजी याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबईत 125 रात्र निवाराकेंद्र बांधण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही अशाप्रकारे कारवाई होत असल्याबद्दल संताप व्यक्त केला जातो आहे. बेघर नागरिकांवरील कारवाई थांबवण्यासाठी 1 सप्टेंबर 2022 रोजी आपण पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले होते, असे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटले आहे. पुरेशी निवारा केंद्र उभारली जाईपर्यंत कारवाई थांबवावी तसेच पंतप्रधान आवास योजनेत बेघर नागरिकांना घरे द्यावीत, अशी मागणी गलगली यांनी या पत्रात केली आहे.