युवती रिक्षात विसरली 9 तोळ्यांचे दागिने, मग, रिक्षावाल्यानं केलं असंकाही…
पोलिसांनी तांत्रिक तपास करत या रिक्षाचा शोध घेतला.
मुंबई : मुंबईत राहणाऱ्या आस्था निकम या युवतीच्या घराचं काम सुरू आहे. त्यामुळं तिनं तिच्या आईचं नऊ तोळ्यांचं गंठण अंबरनाथला राहणाऱ्या तिच्या मामाच्या घरी ठेवलं होतं. दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी हे गंठण लागणार होतं. आस्था ही मुंबईहून अंबरनाथला आली. मामाकडून गंठण घेऊन घाटकोपरला परत जाण्यासाठी निघाली. यावेळी अंबरनाथ रेल्वे स्थानकापर्यंत रिक्षाने येऊन ती रेल्वे स्थानकात गेली.
मात्र ज्या पर्समध्ये तिने आईचं नऊ तोळ्यांचं गंठण ठेवलं होतं, ती पर्स मात्र ती रिक्षामध्येच विसरली. ही बाब लक्षात येताच तिने मामाच्या घरी जात हा प्रकार सांगितला. त्यानंतर मामाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला धाव घेत पोलिसांकडे याबाबतची तक्रार केली.
यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत या रिक्षाचा शोध घेतला. ही रिक्षा शिवगंगा नगरमध्ये राहणारे रिक्षाचालक रमेश लदगे यांची असल्याचं समोर आलं. त्यानुसार पोलिसांनी लदगे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आपल्या रिक्षात एक बॅग महिला प्रवासी विसरून गेल्याचं सांगितलं.
मात्र ती बॅग लदगे यांनी उघडून देखील पाहिली नव्हती. पोलिसांनी संपर्क साधताच लदगे यांनी प्रामाणिकपणे ही बॅग पोलिसांच्या सुपूर्द केली. त्यानंतर आस्था निकम आणि त्यांच्या परिवाराने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन रिक्षाचालक रमेश लदगे यांचा सत्कार केला.
यावेळी शिवाजीनगर पोलिसांनी रिक्षात राहिलेलं नऊ तोळ्यांचं गंठण आस्था निकम यांना सुपूर्द केलं. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक असोक भगत यांनी दिली.
अंबरनाथमध्ये रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा दाखवला. रिक्षात विसरलेलं नऊ तोळ्यांचं गंठण परत केलं. शिवाजीनगर पोलिसांनी या रिक्षाचालकाचा शोध घेत हे गंठण परत मिळवून दिलं.