Ajit Pawar : ‘शरद पवार यांच्यामुळेच मी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला’; भुजबळांनी पवारांवरच दिलं ढकलून!
अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आहेत. राज्यातच नाहीतर देशभर या शपविधीची चर्चा आहे. हे नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. यामधील छगन भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूंकप झाला आहे. 2019 च्या निवडणूकीनंतर आतापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेने 3 सरकार पाहिली आहेत. फायरब्रँड नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आहेत. राज्यातच नाहीतर देशभर या शपविधीची चर्चा आहे. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, अदिती तटकरे यांच्यासारखे नेते आहेत. हे नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. यामधील छगन भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
शरद पवारांनी आम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं, 2024 ला पंतप्रधान मोदी हेच देशाचे नेतृत्व करणार आहे, तेच पंतप्रधान म्हणून पुन्हा निवडूण येणार आहे. यामुळेच आम्ही हा सकारात्मक निर्णय घेतला आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला मदत केली पाहिजे, देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. विनाकारण रस्त्यावर भांडण करून काहीही फायदा होणार नसल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
भाजप- शिवसेना युतीत बिनसल्यानंतर फडणवीस यांनी अजित पवार यांच्या सोबत सरकार स्थापन केलं होतं. पण, हे सरकार 72 तासांच्या आतच पडले. यानंतर महाविकास आघाडी हा नवीन प्रयोग घडला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. थोड्याच काळात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून, भाजपसोबत सरकार बनवले. आता यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही (अजित पवार गट) सामील झाला आहे.
दरम्यान, छगन भुजबळ हे महाविकास आघाडी सरकारमध्येही मंत्री होते. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर आघाडीतील नेत्यांची मंत्रिपद गेली होती. मात्र आता अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला त्यासोबतच भुजबळही त्यांच्यासोबत सामील झाले. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना परत एकदा मंत्रिपदाची माळ गळ्यात पडली आहे.