उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अडचणीत आणणाऱ्या तीन मोठ्या घडामोडी, आणखी काय-काय घडण्याची शक्यता?
शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ करणाऱ्या तीन मोठ्या कारवाया सध्या चर्चेत आहेत. या कारवायांमध्ये नेमकं काय निषपन्न होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या कारवायांमुळे ठाकरे गटाची कोंडी नक्कीच झालीय.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ करणाऱ्या तीन मोठ्या कारवाया सध्या करण्यात येत आहेत. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीला देण्यात आलेल्या कंत्राट प्रकरणी ईडीचं एकीकडे धाडसत्र सुरु आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेने उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ घरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वांद्र्यातील शाखेला बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त केलं आहे. संबंधित शाखा ही अनधिकृत होती, असा ठपका ठेवण्यात आलाय. तर तिसरी कारवाई म्हणजे ठाकरे गटाच्या विरोधात एसआयटीशी चौकशी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांमध्ये ठाकरेंच्या विरोधात दोन मोठ्या कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ठाकरे गटाच्या विरोधात ईडीचं धाडसत्र
ठाकरे गटाच्या विरोधातील सर्वात मोठी कारवाई म्हणजे ईडीच्या धाडी. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीला कोविड सेंटरचं कंत्राट दिल्या प्रकरणी ईडीची कारवाई सुरु आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता ईडीकडून थेट धाडसत्र सुरु आहे. ईडीने काल ठाकरे गटाचे सचिव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या घरी तब्बल 17 तास झाडाझडती घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज चव्हाण यांच्या अडचणी वाढण्याची आणखी शक्यता आहे. सुरज चव्हाण यांचं व्हाट्सअॅप चॅट ईडीच्या हाती लागलं आहे. सुरज चव्हाण यांचे सुजीत पाटकर, राजीव साळुंखे आणि संजय शाह यांच्यासोबतचे चॅट ईडीच्या हाती लागली आहे. चव्हाण यांनी लाईफलाईन कंपनीला कंत्राट मिळवून दिल्याचा ईडीला संशय आहे.
ईडीच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे
ईडी अधिकाऱ्यांच्या तपासात 150 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रे मिळाली आहेत. 50 स्थावर मालमत्तांची किंमत 150 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. ईडी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत 16 ठिकाणी छापे टाकले आहेत. या छापेमारीत ईडी अधिकाऱ्यांनी अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. 68 लाख रुपयांची रोख रक्कमसह सोने मिळून तब्बल अडीच कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
ठाकरे गटाच्या शाखेवर हातोडा
ठाकरे गटाविरोधात दुसरी मोठी कारवाई म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या घराजवळ असलेल्या शाखेवर मुंबई महापालिकेने कारवाई केली. संबंधित शाखेचं बांधकाम अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली.
ठाकरे गटाविरोधात एसआयटी स्थापन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीबद्दल घोषणा केलीय. “पर्दाफाश करायचं ठरलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेत सीएजीच्या रिपोर्टमध्ये सांगितलेल्या साडेबारा हजार कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. त्या एसआयटीच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे पैसे वसूल करण्याचं काम सरकार करेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.