Mumbai Toll Rate Increase | मुंबईत उद्यापासून टोल महाग! किती पैसे आकारले जाणार?
मुंबईत उद्यापासून पाच टोलनाक्यांवर टोलच्या दरात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे आता वाहनचालकांना उद्यापासून टोलचे जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत. टोलनाक्याचे दर हे जवळपास 12.50 टक्क्यांपासून 18.75 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून टोलनाक्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला जातो. मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यांची दुर्दशा झाल्याने मनसेकडून काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी काही मनसैनिकांनी टोलनाक्यांवर तोडफोड केल्याची देखील माहिती समोर आली होती. मनसेकडून टोलच्या दरात होणाऱ्या वाढीवरही अनेकदा टीका करण्यात येते. असं असताना आता मुंबईतील पाच प्रवेशद्वारांवर असणाऱ्या टोल नाक्यांवर उद्यापासून आजपेक्षा जास्त टोल आकारला जाणार आहे. कारण टोल दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत उद्यापासून प्रवेश महागणार आहे. टोल दराच 5 ठिकाणी वाढ झालीय. वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसरमधील टोल दरात वाढ झालीय. एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून टोल दरात वाढ करण्यात आली आहे. जवळपास 12.50 ते 18.75 टक्क्यांनी ही वाढ झालीय. त्यामुळे आता उद्यापासून मुंबई आणि उपनगरात ये-जा करणाऱ्या वाहनांना टोलसाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत.
टोलच्या दरात नेमकं किती वाढ?
मुंबईत सध्या चारचाकी वाहनांना (कार) 40 रुपये टोल आकारला जातो. पण उद्यापासून हाच टोल 45 रुपये इतका आकारला जाईल. पाचही टोल नाक्यांवर मिनी बससाठी 65 रुपये टोल आकारला जात होता. पण आता हाच टोल 75 रुपये इतका आकारण्यात आला आहे. ट्रकसाठी सध्या 130 रुपये टोल आकारला जातोय. पण उद्यापासून 150 रुपये टोल आकारला जाणार आहे. अवजड वाहनांसाठी सध्या 160 रुपये टोल आकारला जातोय. पण उद्यापासून हेच दर 190 रुपयांवर जावून पोहोचणार आहेत.