Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : शरद पवारांसमोर निधीवरून वाद, सुनील शेळके आणि सुप्रिया सुळेंमध्ये खडाजंगी
जिल्हा नियोजन बैठकी निमित्तानं लोकसभेनंतर पहिल्यांदाच शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवारांसह पुण्यातले आमदार एकत्रित आले. मात्र या बैठकीत पवारांसमोरच निधीवरुन सुप्रिया सुळे आणि अजितदादांचे आमदार सुनिल शेळकेंमध्ये वाद झाला. पाहा स्पेशल रिपोर्ट.
पुणे जिल्हा नियोजन समितीत सुप्रिया सुळे आणि अजितदादा गटाचे आमदार सुनिल शेळकेंमध्ये खटके उडाले. हा सारा वाद शरद पवार, अजित पवारांच्या उपस्थितीत घडला. निमित्त होतं निधीचं, बारामती आणि शिरुरला निधी का मिळत नाही. मावळला जसा निधी मिळतो. तोच न्याय बारामती शिरुरला का नाही. म्हणून सुळेंनी प्रश्न केला. यावर आचारसंहितेमुळे निधी देता आला नाही, असं अजित पवार उत्तर देत असतानाच त्यांचे आमदार सुनिल शेळके आक्रमक झाले., तिथूनच वादाला सुरुवात झाली.
वादानंतर अजित पवारांनी जिल्हा नियोजन बैठकीत आमदार-खासदार निमंत्रित असतात, त्यांच्याऐवजी बोलण्याचा सर्व अधिकार समितीच्या सदस्यांना असतो म्हणून मुद्दा मांडला. मात्र सरकारच्या काही कागदपत्रांमध्ये निमंत्रित, विशेष निमंत्रितांना बोलण्याचा, चर्चेमध्ये भाग घेण्याचा अधिकार असल्याच उल्लेख आहे.
पाहा व्हिडीओ:-
दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार या बैठकीत पहिल्यांदा एकत्र दिसले. दोघांमध्ये औपचारिक बोलणं झालं नसलं तरी दूषित पाण्यासंदर्भात शरद पवारांनी अजित पवारांना काही प्रश्न केले. शरद पवारांनी अजित पवारांना प्रश्न केला की. बारामतीत दूषित पाणी येतंय. हात घातला की काळं पाणी येतंय. ज्याच्यामुळे हे होतंय त्यावर काय कारवाई होतेय.
अजित पवारांनी उत्तर दिलं की बारामती परिसरात काही कारखान्यांमुळे प्रदूषण होतंय. प्रदूषण बोर्डाकडून नोटीस बजावण्यास सांगितलं गेलंय. पण या घडीला कारखाने बंद केले तर शेतकऱ्यांची अडचण होऊ शकते. याशिवाय संसदेच्या अधिवेशनाआधी राज्यात खासदारांची एकत्रित बैठक होवून मूळ प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांकडे केली. त्यावर ही कल्पना चांगली असून अजित पवारांनी तातडीनं मुख्यमंत्री शिंदेंना फोन केला.