Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : दादांसोबत असंगती’ महायुतीत नापसंती? पाहा Video
तानाजी सावंतांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल केलेल्या वक्तव्यानं तणाव असतानाच, आता भाजपच्या गणेश हाकेंनी भर घातली. असंगाशी संग केला, दादांशी युती दुर्देवी असल्याचं हाके म्हणालेत. त्यामुळं पुन्हा महायुतीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झालीय.
आधी शिंदेंचे मंत्री तानाजी सावंत आणि आता भाजपचे प्रवक्ते गणेश हाके. महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळं शिवसेना आणि भाजपचा दम घुटतोय, अशासारखी वक्तव्य सावंत आणि हाकेंची आहेत. दादांच्या राष्ट्रवादीसोबत मंत्री सावंतांना उलटी होते. तर, हाकेंनी अजित पवारांना असंगाशी असं म्हणत दुर्दैवी युती म्हटलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर एवढी जळजळीत टीका झाल्यावर, दादांच्या प्रवक्त्त्यांनीही मोर्चा सांभाळत, हाकेंचा यथेच्छ समाचार घेतला.
स्वत: अजित पवारांनी मात्र माझ्या अंगाला भोकं पडत नाही अशी प्रतिक्रिया दिली. वादाला आणखी हवा देणं टाळलं. तर, त्यांचेच मंत्री भुजबळांनी मात्र अशी वक्तव्यं का येत आहेत, याचा विचार केला पाहिजे असं सूचक वक्तव्य केलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत उलट्या येतात असं तानाजी सावंत म्हणाले. त्यावरुन पुन्हा सावंतांकडून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण सावंत माध्यमांवरच भडकले. तर अजित पवारांसोबत सावंतांना उलट्या का होतात, आणि सावंताना राग का येतो, यावरुन आव्हाडांनी सनसनाटी आरोप करुन खळबळ उडवलीय. आरोग्य खात्यातील 3 लाखांची गाडी 30 लाखांना घेण्यासाठी अजित पवारांनी नकार दिला आणि फाईलवर सहीच केली नाही, त्यामुळं सावंतांना उलटी होते असं आव्हाड म्हणालेत.
पाहा व्हिडीओ:-
तानाजी सावंत आणि हाकेंच्या वक्तव्यानं, दादांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांचा संताप अनावर झाला. पण नागपुरात लाडकी बहीण कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार एकत्र आले. तिघेही एकाच मंचावर होते. महायुती भक्कम असल्याचा मेसेज देण्याचा प्रयत्न झाला. तर, हाकेंनी यू टर्न घेत, ते आपलं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबतच्या युतीला फडणवीसांनी एकदा राजकीय युती सांगितलंय. तर नुकतंच, कधी तह तर कधी सलगी करावी लागते, हेही फडणवीस बोललेत. मात्र अस्वस्थता अधून मधून, कधी रामदास कदम, कधी तानाजी सावंत तर कधी, हाकेंच्या बोलण्यातून बाहेर पडतेय. हाकेंनी आपण जे बोललो ती पक्षाची भूमिका नाही तर वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं. आणि वादाला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला. तर तानाजी सावंताना मुख्यमंत्री शिंदेंनी मुंबईत बोलावलं. ज्यात कडक समज सावंतांना देण्यात येईल.