Tv9 स्पेशल रिपोर्ट : साताऱ्याचे दोन्ही राजे पुन्हा एकमेकांना भिडले, आता नेमकं काय झालंय
साताऱ्याचे दोन्ही राजे पुन्हा एकमेकांना भिडले आहेत. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. साताऱ्याच्या दोन्ही राजांमधली जुगलबंदी रंगलीय.
मुंबई : साताऱ्याचे दोन्ही राजे पुन्हा एकमेकांना भिडले आहेत. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले य़ांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. साताऱ्याच्या दोन्ही राजांमधली जुगलबंदी रंगलीय.
एकमेकांचे चुलत भाऊ असलेले साताऱ्याचे दोन राजे पुन्हा आमनेसामने आले आहेत. साताऱ्यात सध्या बाजार समिती निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि काही दिवसांनी नगरपालिकेचा रणसंग्रामही होणार आहे. त्याआधी दोन्ही राजांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झालीय.
शिवेंद्रराजेंनी केलेल्या भ्रष्टाचाऱाच्या आरोपांवर उदयनराजेंनी उत्तर दिलंय आणि भ्रष्टाचार केल्याचं सिद्ध झाल्यास स्वत:च्या मिशा आणि भुवया काढून टाकण्याचं वक्तव्य केलंय. हे दोन्ही राजे भाजपमध्ये आहेत. शिवेंद्रराजे भाजपचे आमदार आहेत तर उदयनराजे भाजपचेच राज्यसभा खासदार आहेत. तरीही या दोन्ही नेत्यांमधून विस्तवही जात नाहीए.
साताऱ्याचे दोन्ही राजे कधी एकमेकांना मिठ्या मारतात. तर कधी एकमेकांवर टोकाचे आरोप करतात कधी त्यांचं मनोमिलन होतं. तर कधी ते एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे राहतात. आता सातारा नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत.. त्याआधी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झालीय..