Uddhav Thackeray Group | “आमचं नाव घेऊन…”, शीतल म्हात्रे यांच्या आरोपांना ठाकरे गटाकडून रोखठोक उत्तर
शीतल म्हात्रे यांनी तो व्हीडिओ व्हायरल करण्याचे आदेश हे मातोश्रीवरुन देण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपावरुन ठाकरे गटाच्या खासदाराने उत्तर दिलं आहे.
मुंबई | शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या आणि माजी आमदार शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फ व्हीडिओवरुन सध्या वातावरण पेटलंय. या व्हीडओवरुन पुन्हा एकदा सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आलेत. शनिवारी मुख्यमंत्री दहीसरमध्ये आले होते. या रॅलीत शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हजर होते. या दोघांचा व्हीडिओ काढून त्यासह छेडछाड करण्यात आली आणि एडीट करुन व्हायरल करण्यात आला. या प्रकरणावरुन शीतल म्हात्रे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर आरोप केले. तसेच संताप व्यक्त केला. हा व्हीडिओ ठाकरे गटाकडून व्हायरल करण्यात आल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला. मात्र अवघ्या काही मिनिटांनी म्हात्रे यांनी केलेल्या या आरोपांना ठाकरे गटाकडून जशास तसं उत्तर देण्यात आलं आहे.
शीतल म्हात्रे यांच्या आरोपांना ठाकरे गटाकडून खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी रोखठोक उत्तर दिलंय. आमचं नाव घेऊन प्रसिद्ध मिळवणं म्हणजे बेशरमपणा असल्याचं चतुर्वेदी म्हणाल्या. तसेच चतुर्वेदी यांनी म्हात्रे यांच्यावर जोरदार टीकाही केली.
प्रियंका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर केलेल्या आरोपांवरुन ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आमचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळवणं म्हणजे बेशरमपणा आहे” अशा शब्दात चतुर्वेदी यांनी म्हात्रे यांच्यावर टीका केली आहे.
“त्यांना वाटतं की आमच्याकडे काही उद्योग नाही. ज्यांनी स्वत:च नाव बदनाम केलंय. ज्यांनी 50 खोके खाऊन काम करतायेत, आम्ही त्यांच्यासाठी व्हीडिओ बनवणार?”, असा सवाल चतु्र्वेदी यांनी उपस्थित केलाय.
“आम्हाला स्वत:ची कामं आहेत. आमची कामं जनतेशी संबंधित आहेत. जनतेशी कामाशी आमची बांधिलकी आहे. तसेच जर असा व्हीडिओ व्हायरल झाला असेल, तर त्यासाठी सायबर सेल आहे. सायबर सेल त्यांची जबाबदारील पार पाडेल. पण आरोप करणं, राजकारण करणं, तसेच प्रसिद्धीसाठी दुसऱ्यांवर आरोप करणं हा बेशरमपणा आहे”, असं चतुर्वेदी म्हणाल्या.
नक्की प्रकरण काय?
दहिसरमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या रॅलीसाठी आले होते. भूमिपूजन, उद्घाटन, रॅली आणि भाषण पार पडलं. एकूण 4.30 तास हा कार्यक्रम होता. आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे या रॅलीत सहभागी झाले होते. व्हीडिओ काढणाऱ्यांनी आपल्या सोयीच्या अँगलने व्हीडिओ काढला आणि एडीट केला. यावरुन सर्व राजकारण पेटलंय.