Uddhav Thackeray : ‘…मग महाराष्ट्रातील हिंदूंनी काय गुन्हा केलाय?’; उद्धव ठाकरेंचा थेट अमित शहांना सवाल
Uddhav Thackeray on Amit Shah : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. रामलल्लांच्या मोफत दर्शनाच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी भाजप आणि अमित शहांना लक्ष्य केलं.
निवृत्ती बाबर, मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये रामलल्लाचं मोफत दर्शन करून देण्याचं आश्वासन दिलं होतं. यासाठी शहा यांनी जनतेला भाजपला मतदान करा तुम्हाला रामलल्लाचं मोफत दर्शन करून देतो असं म्हटलं होता. याचाच धागा पकडत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्याासह भाजपवर निशाणा साधला आहे. मीरा भाईंदर येथे गोवर्धन पूजा कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामधून टीका केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
काही राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. त्यावेळेस सांगितलं की भाजपला मत जर दिलं तर रामलल्लाचं मोफत दर्शन करणार? रामलल्ला काय तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे काय? आमचं हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम. महाराष्ट्रातील हिंदूंनी काय गुन्हा केलाय मग भाजपला मत दिलं तर मोफत रामलल्लाचं दर्शन हे कसलं हिंदुत्व? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
भाजपला मत दिलं तर मोफत रामलल्लाचं दर्शन हे कसलं हिंदुत्व? उद्योग महाराष्ट्रातले गुजरातला घेऊन जात आहेत. सुरत मजबूत होगा तो देश मजबूत होगा म्हणतात. महाराष्ट्र मजबूत झाला तर देश मजबूत होणार नाही. उत्तर प्रदेश मजबूत झाला तर देश मजबूत होणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जय कृष्णा बोला आणि हुकूमशाहीला गाढा नवीन नारा दिला.
दरम्यान, आमच्या घरी अनेक उत्तर भारतीय येतात. चांगलं मराठीत बोलतात. तेव्हा जेव्हा विचारतो गाव कोणतं? तेव्हा बोलतात गाव कुठे? गेल्या अनेक पिढ्या इथेच राहिल्या, आपण इथे एकत्र राहतो पण निवडणुकांच्या वेळी तुमचं जात बांधव येतो आणि ब्रेन वॉश करतो. आपण एक आहोत मग दूध आणि साखरेत मीठ कोण टाकतं? असाही सवाल ठाकरेंनी केला.