Uddhav Thackeray : प्रेमानं मागितलं असतं तर सर्वकाही दिलं असतं, पण हिसकावण्याचा प्रयत्न केला तर जागा दाखवणारच, उद्धव ठाकरे संतापले
आज हे मुळावर घाव घालायला निघाले आहेत. ज्याला आपले मानत होतो, ते एवढे सुडाने पेटले आहेत, की शिवसेना संपलीच पाहिजे या भाजपाच्या डावाला बळी पडून ते आपल्या मुळावर घाव घालत आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
मुंबई : मला त्यांनी मागितले असते तर मी दिले असते. माझा स्वभाव तुम्हाला माहीत आहे. जो बाळासाहेबांचाही (Balasaheb Thackeray) होता. मागितले तर मी काहीही देईन. पण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र, त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे गटाला लगावला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या ऑनलाइन बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतून बंड केलेल्यांवर टीका केली. ते म्हणाले, की आता त्यांनी निवडणुकीला सामोरे जावे आणि मते मिळवावी. पण ही हिंमत यांच्यात नाही. कारण हे खरे मर्दच नाहीत. दुसऱ्यांचा पक्ष चोरणे, दुसऱ्यांची चिन्हे चोरण्याचा प्रयत्न करणे, मात्र ते चोरले जाऊच शकत नाही. याला हिंमत लागते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
‘आपले मानत होतो, ते सुडाने पेटले’
आज हे मुळावर घाव घालायला निघाले आहेत. ज्याला आपले मानत होतो, ते एवढे सुडाने पेटले आहेत, की शिवसेना संपलीच पाहिजे या भाजपाच्या डावाला बळी पडून ते आपल्या मुळावर घाव घालत आहेत. मला त्यांनी मागितले असते तर मी दिले असते. माझा स्वभाव सर्वांना माहीत आहे, जो बाळासाहेबांचादेखील होता. मागितले तर मी काहीही देईन. पण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, तर मात्र त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचे जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन
‘…मला कशाचीही पर्वा नाही’
आता त्या ईर्षेने आणि जिद्दीने मी उभा राहिलो आहे. ही इर्षा केवळ आणि केवळ तुमच्या भरवश्यावर आहे. तुम्ही सोबत असल्यास मला कशाचीही पर्वा नाही. समोर भाजपा असू दे की हे गद्दार नामर्द असू दे. मला त्यांची पर्वा नाही. ते काही काळ सत्ता उपभोगतील. पण जेव्हा भाजपाला कळेल हे काडीच्या कामाचे नाहीत, तेव्हा भाजपा त्यांना फेकून देईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी टीव्हीवर अश्रू ढाळणाऱ्या रामदास कदम यांच्यावरही टीका केली. शिवसेनेच्या विरोधात कारवाया करायच्या त्या तुम्ही केल्या. आता रडण्याचे ढोंगसोंग करू नका. शिवसैनिक तुम्हाला पुरते ओळखून आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. यावेळी शिवसैनिकांना अधिकाधिक नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.