Uddhav Thackeray | ‘नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला’, उद्धव ठाकरेंची निकालानंतर पहिली प्रतिक्रिया
"निवडणूक आयोगाचा निकाल जो चुकीचा आहे, ज्याला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे तो निर्णय त्यांनी ग्राह्य धरलं आहे. म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायच चुकला आहे. त्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा जो अपमान केला आहे त्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का ते आम्ही बघणार आहोत", अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच निकालाची मॅच फिक्सिंग होती. या निकालाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
मुंबई | 10 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज निकाल जाहीर केला. या निकालात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा दिला आहे. तर ठाकरे गटाला मोठा झटका दिला आहे. या निकालाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष बहाल केला आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील पक्ष हाच मूळ पक्ष असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलंय. तसेच भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती वैध ठरवली आहे. तसेच दोन्ही गटाच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निकालावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली.
“मी पहिली प्रतिक्रिया कालच दिली आहे. ज्या पद्धतीने राहुल नार्वेकर यांना बसवलं होतं, त्यांची वागणूक बघून स्पष्टपणे दिसत होतं की यांची मिलिभगत किंवा यांचं संगनमत झालं आहे. काल माझ्या पत्रकार परिषदेत एक शंका उपस्थित केली होती की, लोकशाहीचा खून करण्यासाठी यांचं काही कटकारस्थान चाललं आहे का?कारण मी परत एकदा सांगतो, त्यांनी जावून आरोपीची दोनवेळा भेट घेतली. मात्र आजच्या निकालामुळे एक गोष्ट आणखी प्रश्नांकीत झाली आहे की, लोकशाहीची यांनी हत्या केली आहेच, पण पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी पक्षांतर कसं करावा अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे हे निकालातून दाखवून दिलं आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
‘सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय धाब्यावर बसवले’
“विधानसभा अध्यक्षांनी स्वत: दोन-तीन पक्ष बदलले आहेत. त्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा दूर करुन घेतला असेल. मात्र आजपर्यंत आपण मानत आलो की, भारताच्या घटनेनुसार जे सत्य आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्वोच्च असतात. पण नार्वेकरांनी जो काही निकाल दिला, सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत ते स्पष्टपणे धाब्यावर बसवले, पायदडी तुडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयातही जुमानत नाहीत, हे त्यांच्या आजच्या निकालातून स्पष्ट दिसून आलं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्रातील लहान मुलंही देईल’
“महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, त्यांनी अपात्र कुणालाच केलेली नाही. मूळ प्रकरण हे अपात्रतेचं होतं. अपात्र कुणालाच ठरवलं नाही. आमची घटना दुरुस्ती तुम्ही ग्राह्य धरत नसाल तर मग तुम्ही आम्हाला अपात्र का नाही केलं? त्याही पलिकडे जावून त्यांनी निकाल दिला की शिवसेना कुणाची? शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्रातील लहान मुलंही देईल. एवढं हे स्पष्ट आणि स्वच्छ आहे”, असा दावा ठाकरेंनी केला.
‘त्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला’
“निवडणूक आयोगाचा निकाल जो चुकीचा आहे, ज्याला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे तो निर्णय त्यांनी ग्राह्य धरलं आहे. म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायच चुकला आहे. त्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा जो अपमान केला आहे त्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का ते आम्ही बघणार आहोत. पण तशी याचिका दाखल करता येत नाही त्याचाच त्यांनी गैरफायदा घेतला आहे”, असं ठाकरे म्हणाले.
‘सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करावी’
“महाराष्ट्राच्या जनेतेला मी विनंती करतो की, देशातील लोकशाही यांनी पायदळी तुडवली आहेच, पण आता सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्वसुद्धा शिल्लक राहणार आहे की नाही हे सर्वोच्च न्यायलायने ठरवलं पाहिजे. आम्हाला अवमान याचिका याचिका दाखल करता येत नसेल तर सर्वोच्च न्यायालय सुमोटो याचिका दाखल करणार आहे का? अशी काही कारवाई करणार आहे का?”, असा सवाल ठाकरेंनी केलाय.