Covid Vaccination : मुंबईत उद्यापासून 12 ते 14 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण
12 समर्पित लसीकरण केंद्रांचा अभ्यास, अडचणी आणि प्रतिसाद पाहून आरोग्य सुविधांसह इतर बाबींचा विचार करुन त्यानंतर महानगरपालिकेच्या व शासनाच्या सर्वंच केंद्रांवर 10 ते 14 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे.

मुंबई : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे (Campaign)चा पुढील भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 16 मार्च 2022 पासून 12 वर्षे पूर्ण ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड-19 लसीकरण (Vaccination) करण्यात येणार आहे. मुंबईतील 12 समर्पित केंद्रांवर 2 दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी 12 वाजेपासून हे लसीकरण सुरु होणार आहे. 12 समर्पित लसीकरण केंद्रांचा अभ्यास, अडचणी आणि प्रतिसाद पाहून आरोग्य सुविधांसह इतर बाबींचा विचार करुन त्यानंतर महानगरपालिकेच्या व शासनाच्या सर्वंच केंद्रांवर 10 ते 14 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे. (Vaccination of children in the age group of 12 to 14 years from tomorrow in Mumbai)
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 16 जानेवारी 2021 पासून कोविड-19 साथ आजाराकरीता प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण मोहिमेत आधी प्राधान्य गट, त्यानंतर 1 मे 2021 पासून 18 वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे आणि 03 जानेवारी 2022 पासून 15 वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.
लाभार्थ्यांना Corbevax ही लस हातावर स्नायूमध्ये देण्यात येणार
केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 16 मार्च 2022 पासून 12 ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड-19 लसीकरण करण्यात येणार आहे. प्रायोगिक 12 लसीकरण केंद्रांच्या अभ्यासानंतर इतर सर्व केंद्रांवर 12 ते 14 या वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळा, सामाजिक सेवाभावी संस्था, मंडळे आदींचेही सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच 12 ते 14 वयोगटातील लाभार्थ्यांची त्या-त्या भागातील लोकसंख्या लक्षात घेऊन त्या लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे लक्ष करण्यात येणार आहे. यामध्ये 1 जानेवारी 2008 ते 15 मार्च 2010 पूर्वी जन्मललेले लाभार्थी पात्र असतील. 12 वर्ष पूर्ण ते 14 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना Corbevax ही लस हातावर स्नायूमध्ये देण्यात येणार आहे. सदर लसीच्या 28 दिवसाच्या अंतरावर दोन मात्रा देण्यात येणार आहे.
12 पूर्ण झालेल्या पाल्यास लसीकरण करुन घेण्याचे पालकांना आवाहन
सद्यस्थितीत केंद्र शासनामार्फत कोविन प्रणालीमध्ये या लसीकरणासंदर्भात आवश्यक बदल उद्या सकाळपर्यंत होणे अपेक्षित आहेत. सदर लसीकरण मुंबईतील 12 समर्पित केंद्रावर 16 मार्च 2022 रोजी दुपारी 12 वाजता सुरु करण्यात येईल. कोविन प्रणालीत आवश्यक बदल झाल्यानंतर महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर सदर लसीकरण सुविधा उपलब्ध होईल. केंद्र शासनामार्फत कोविन प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरु असल्यामुळे 12 वर्ष पूर्ण न झालेल्या लाभार्थ्यांची देखील लसीकरणासाठी नोंदणी होऊ शकते, परंतु पालकांनी आपल्या 12 वर्ष पूर्ण झालेल्याच पाल्यास लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
12 ते 14 वर्षे वयोगटासाठी मुंबईतील समर्पित लसीकरण केंद्रांची यादी
1. ई विभाग – टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर धर्मादाय रुग्णालय, मुंबई सेंट्रल 2. ई विभाग – ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालय, नागपाडा, मुंबई सेंट्रल 3. एफ उत्तर विभाग – लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रुग्णालय, शीव (पूर्व) 4. एफ दक्षिण – राजे एडवर्ड स्मारक (के.ई.एम.) रुग्णालय, परळ 5. एच पूर्व – वांद्रे-कुर्ला संकुल (बी. के. सी.) जंबो कोविड लसीकरण केंद्र, वांद्रे (पूर्व) 6. के पूर्व – सेवन हिल्स रुग्णालय, वांद्रे (पूर्व), 7. के पश्चिम – डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, विलेपार्ले (पश्चिम) 8. पी दक्षिण – नेस्को जंबो कोविड लसीकरण केंद्र, गोरेगांव (पूर्व), 9. आर दक्षिण – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालय, कांदिवली (पश्चिम), 10. एन विभाग – राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (पूर्व). 11. एम पूर्व विभाग – पंडीत मदनमोहन मालवीय रुग्णालय (शताब्दी रुग्णालय), गोवंडी, 12. टी विभाग – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रुग्णालय, मुलुंड (Vaccination of children in the age group of 12 to 14 years from tomorrow in Mumbai)
इतर बातम्या
VIDEO: फडणवीसांनी आमचं संभाषण चोरासारखं ऐकलं, अनिल गोटेंची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
