वेदांता फॉक्सक्वॉन शिंदे सरकारमुळे बाहेर गेला..; आदित्य ठाकरेंच्या आरोपांना सरकारचं प्रत्युत्तर…
शिंदे-फडणवीस यांचेच 5 सप्टेंबरला सरकार अस्तित्वात होतं, आणि 5 सप्टेंबर रोजीच एमआयडीसीकडून वेदांता-फॉक्सक्वॉनला पत्रही लिहिण्यात आलं होतं.
मुंबईः वेदांता फॉक्सक्वॉन प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर शिंदे सरकारवर ठाकरे गटाने जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतरही महाराष्ट्रात राजकारण आणि आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. कागदपत्रं दाखवून, शिंदे सरकारमुळंच प्रकल्प गेल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे तर 12 तासांच्या आतच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंचा एक एक दावा खोडून काढला आहे.
वेदांता-फॉक्सक्वॉनच्या प्रकल्पावरुन, आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारच्याच काळातलं पत्र भर पत्रकार परिषदेत दाखवलं होतं.
आणि प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात नाही तर, शिंदे सरकारच्याच काळात गेल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता.
वेदांता प्रकरणावरून वाद पेटला असतानाच आता आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल चढवत सांगितले की, 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि 5 सप्टेंबर रोजी शिंदे सरकारच्याच काळातच पत्रही लिहिलं होतं.
आणि त्यानंतर वेदांता-फॉक्सक्वॉनचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी सांमजस्य करार करण्यासाठी निमंत्रित करण्यात आल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या या दाव्यानंतर मात्र या प्रकल्पासाठीच पत्र लिहिलं पण करार झालाच नाही, असं उद्योगमंत्री उदय सामंतांनी यांनी स्पष्ट केले आहे.
वेदांता प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास 1 लाख रोजगार निर्मितीचा प्रकल्प पुण्यातील तळेगावातून गुजरातला गेल्यामुळेच आता राजकारण तापले आहे आणि यावरूनच ही चिखलफेक सुरु आहे.
आदित्य ठाकरेंच्या एका पाठोपाठ एक पत्रकार परिषदा सुरु आहेत, त्यामुळं आता वेदांता फॉक्सक्वॉनच नाही तर इतर उद्योग महाराष्ट्राबाहेर कधी आणि कसे गेले, याची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींकडून करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
शिंदे-फडणवीस यांचेच 5 सप्टेंबरला सरकार अस्तित्वात होतं, आणि 5 सप्टेंबर रोजीच एमआयडीसीकडून वेदांता-फॉक्सक्वॉनला पत्रही लिहिण्यात आलं होतं.
असा पहिला दावा कागदपत्रांच्या आधारे आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्याचबरोबच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी शंका उपस्थित केली आहे. 29 ऑगस्टची बैठक प्रकल्प महाराष्ट्रातच ठेवण्यासाठी होती की गुजरातला पाठवण्यासाठी होती ?, असा सवाल आता आदित्य ठाकरे यांनी केला आहे.