Mumbai Water Supply : मुंबईत दोन दिवस पाणीबाणी! ‘या’ विभागांचा पाणीपुरवठा राहणार पूर्णपणे बंद, तर काही भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईच्या काही विभागांमध्ये मंगळवार दिनांक सात जून 2022 रोजी सकाळी दहा वाजेपासून ते बुधवार आठ जून 2022 रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai) महत्त्वाची बातमी आहे. जलवाहिनी जोडकामामुळे दोन दिवस एफ दक्षिण विभागातील अनेक परिसरांमध्ये तसेच ए,बी, ई या विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनी जोडकामामुळे मंगळवार दिनांक सात जून 2022 रोजी सकाळी दहा वाजेपासून ते बुधवार 8 जून 2022 रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत असा एकूण 24 तास सबंधित विभागांमध्ये पाणीपुरवठा (Water supply) बंद राहणार आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने एफ/दक्षिण विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता शिवडी बस डेपोसमोर (Shivdi Bus Depot) 750 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जोड असलेली 600 मिलीमीटर आणि 450 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा जोड हा 1500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला देण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी सकाळी दहा वाजता सुरू होऊन बुधवारी सकाळी दहा वाजता पूर्ण होणार आहे. त्यामुळे या कालावधित महानगरपालिकेच्या एफ/दक्षिण विभागातील रुग्णालय प्रभाग, शिवडी (पूर्व व पश्चिम), परळ गांव, काळेवाडी, नायगांव, शिवडी, वडाळा, अभ्युदय नगर यांच्यासह ए, बी, आणि ई विभागातील काही परिसरांमध्ये देखील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर शहर उत्तर व दक्षिण विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
कुठे, कधी पाणीपुरवठा बंद राहणार?
- रुग्णालय प्रभाग : के. ई. एम. रुग्णालय, टाटा रुग्णालय, बाई जेरबाई वाडिया रुग्णालय आणि एम. जी. एम. रुग्णालयात मंगळवारी सकाळी दहा वाजेपासून ते बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्ण पणे बंद राहणार आहे.
- शिवडी (पूर्व) विभाग : शिवडी फोर्ट मार्ग, गाडी अड्डा, शिवडी कोळी वाडा या परिसरातील पाणीपुरठा देखील पूर्णपणे बंद राहणार आहे.
- गोलंजी हिल परिसर : परळ गाव, गं. द. आंबेकर मार्ग 50 टेनामेंटपर्यंत, एकनाथ घाडी मार्ग, परळ गाव मार्ग, नानाभाई परळकर मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळींभे मार्ग, एस. पी. कंपाऊंड या परिसरात मंगळवारी सकाळी दहा वाजेपासून ते बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
- काळेवाडी : परशुराम नगर, जिजामाता नगर, आंबेवाडी, साईबाबा मार्ग, मिंट कॉलनी, राम टेकडी या परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
- नायगांव : जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रिंग मिल चाळ, गं. द. आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेट्ये मार्केट, भोईवाडा गाव, हाफकिन या परिसरातील पाणीपुरवठा कामाच्या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
- अभ्युदय नगर : अभ्युदय नगर, ठोकरसी जीवराज मार्ग परिसरातील पाठीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
- शिवडी वडाळा झोन : ज्ञानेश्वर नगर, जेरबाई वाडिया मार्गचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
- शहर उत्तर पाणीपुरवठा : दादर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, हिंदमाता या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
- शहर दक्षिण पाणीपुरवठा : लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.