NCP Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतील निर्णयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष, जोरदार घोषणाबाजी
sharad pawar resigns : राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक प्रदेश कार्यालयात झाली. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती पक्षाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली. या निर्णयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केली. कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक प्रदेश कार्यालयात झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव मांडण्यात आला आहे. हाच ठराव सर्वच नेत्यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहणार असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा शरद पवार यांनी दिला होता. त्यासंदर्भात बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, आम्ही सर्व जण पवार साहेबांच्या निर्णयानंतर स्तब्ध झालो. आम्हाला अजिबात कल्पना नव्हती की शरद पवार असा काही निर्णय जाहीर करतील. आता आम्ही बैठकीत एक ठराव संमत केला आहे. हा ठराव सर्वसंमतीने केला आहे.
काय आहे ठराव
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत आहे. त्यांनी या पदावर कायम राहवे, अशी विनंती केली जात आहे. त्यांनी कोट्यवधी लोकांच्या भावनांचा समावेश करुन राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती करणार आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतील निर्णयाची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. त्यानंतर राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जल्लोष सुरु करण्यात आले. शरद पवार जिंदाबाद, अशा घोषणा दिल्या गेल्या. समितीने कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला गेला, यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे. गेल्या तीन दिवासांपासून कार्यकर्ते या ठिकाणी ठाण मांडून बसले होते.
एकीकडे पक्ष नेत्यांची बैठक सुरू असतानाच पक्षाच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले होते. या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. हातात फलक घेऊन हे कार्यकर्ते जोरदार घोषणा देत होते. देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो… पवार साहेब… पवार साहेब… शरद पवार… शरद पवार अशा घोषणा हे कार्यकर्ते देत होते. रणरणत्या उन्हात हे कार्यकर्ते घामाघूम होत घोषणा देत आहे.
आत्मदहनाचा प्रयत्न
बैठक सुरु असताना एका कार्यकर्त्याने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तेथील इतर कार्यकर्त्यांनी त्याला रोखले आणि मोठा अनर्थ होण्यापासून टळला.