शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता, निवडणूक आयोगाने निकालात नेमकं काय म्हटलंय?
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या याचिकेवर ऐतिहासिक असा निकाल दिला आहे. या निकालात शरद पवार गटाचा पराभव झाला आहे. पण तरीदेखील शरद पवार गटासाठी निवडणूक आयोगाकडून काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक निकाल आज समोर आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याचिकेवर आज निकाल जाहीर केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाचा हा मोठा विजय मानला जातोय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांनी या निकालानंतर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी या निकालाला नम्रपणे स्वीकारतो’, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्याने आता शरद पवार गटाचं काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय. निवडणूक आयोगाने याबाबतची महत्त्वाच्या सूचना शरद पवार गटाला दिल्या आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने सध्या शरद पवार यांच्या गटाच्या आमदाराला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या आमदारांवर व्हीपच्या मुद्द्यावरुन अपात्रतेच्या कारवाईचा प्रश्न उपस्थित होणार नाही.
निवडणूक आयोगाच्या शरद पवार गटाला सूचना काय?
राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभेची निवडणूक असणार आहे. त्याआधी येत्या 28 फेब्रुवारीला राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. राज्यसभेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार गटाला स्वतंत्र मान्यता देण्यात आली आहे. शरद पवार गटाला उद्यापर्यंत पक्षासाठी नाव आणि चिन्ह कळवावी, अशी सूचना देण्यात आली आहे. शरद पवार गटाने पक्षाचं नवं नाव न सूचवल्यास त्यांना अपक्ष म्हणून मान्यता दिली जाईल. शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला नवीन चिन्ह आणि नावासाठी तीन पर्याय द्यायचे आहेत.
निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या दुपारी चार वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. शरद पवार गटाला उद्या दुपारी चार वाजेपर्यंत नवे चिन्ह आणि नावाचे तीन पर्याय निवडणूक आयोगाला पाठवावे लागणार आहेत. त्यापैकी एका नावाचं आणि चिन्हाची निवड निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे.
आम्ही निकालाविरोधात कोर्टात जाणार, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
निवडणूक आयोगाच्या या निकालावर अजित पवार गटाकडून आनंद व्यक्त केला जातोय. तर शरद पवार गटाकडून संताप व्यक्त केला जातोय. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा निकाल धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. तसेच आपण या निकाला विरोधात कोर्टात जाणार, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. तर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा निकाल अपेक्षितच होता, असं म्हटलं आहे.