Exclusive : कुणबी नोंद असलेला कागद पाहिला का? काय लिहिलंय अहवालात?; शिंदे समितीचा अहवाल टीव्ही9 च्या हाती
तब्बल 40 दिवस मराठवाड्यासह हैदराबादमध्ये जाऊन शिंदे समितीने मराठा समाजाची कुणबी नोंद असणारे कागदपत्रे तपासले. लाखो कागदपत्र तपासल्यानंतर कुणबी नोंदीचे हजारो दस्ताऐवज शिंदे समितीच्या हाती लागले आहेत. हा अहवाल शिंदे समितीने राज्य सरकारला दिला आहे. उद्या होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत हा अहवाल मांडला जाणार असून अहवाल स्वीकारला जाणार आहे.
मोहन देशमुख, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 30 ऑक्टोबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्यापासून ज्यांच्या कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत त्या सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं जाहीर केलं आहे. शिंदे समितीने राज्य सरकारला अहवाल दिला आहे. या अहवालात 11 हजार 530 कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत. उद्या हा अहवाल कॅबिनेटसमोर येणार आहे. त्यानंतर महसूल मंत्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असून उद्याच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हा अहवाल टीव्ही9 मराठीच्या हाती लागला आहे. त्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी नोंदवण्यात आल्या आहेत.
शिंदे समितीच्या अहवालात काय
जिल्हानिहास अभिलेखे तपासून 6 नोव्हेंबरपूर्वी अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
जिल्हानिहाय अंतिम अहवाल आल्यानंतरही काही कालावधी लागणार
शिंदे समिती पुन्हा हैदराबादला जाऊन आणखी नोंदी तपासणार
अंतिम अहवाल करण्यासाठी समिती जाती अभ्यासक, तज्ज्ञांची मदत घेणार
शिंदे समितीला 11 हजार 530 कुणबी जांतीच्या नोंदी आढळल्या
1 कोटी 73 लाख 70 हजार 659 कागदपत्रांची तपासणी केली
सापडलेल्या नोंदी भूमिअभिलेख संकेतस्थळावर अपलोड करणार
त्यामुळे मराठा समाजाला दाखल्याच्या प्रती मिळणं सोपं होईल
निजामकालीन नोंदी असल्याने 9 मोडी लिपी जाणकारांची मदत घेतली
मराठवाड्यातील 8 जिल्यात बैठका झाल्या, पुढेही काम सूरूच राहणार
बहुतांश कागदपत्रे 1967 च्या पूर्वीची आहेत, मोडी, उर्दू, फारसी भाषेत आहेत
भाषा जाणकारांच्या मदतीने अजूनही काम सूरू आहे, कुणबी दाखल्यांची आकडेवारी वाढत आहे
कुठे किती नोंदी आढळल्या
छत्रपती संभाजीनगरमध्ये 23,13,946 नोंदी तपासण्यात आल्या. त्यापैकी 932 कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या.
जालन्यात 19,74,391 नोंदी तपासण्यात आल्या. त्यापैकी 2,764 कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या.
हिंगोलीमध्ये 11,39,340 नोंदींची छाननी केली. त्यापैकी 1762 कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या.
नांदेडमध्ये 15,13,792 नोंदी तपासण्यात आल्या. यात 389 कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या.
परभणीत 20,73,560 नोंदींची छाननी केली. त्यापैकी 1,466 कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या.
लातूरमध्ये 20,73,464 नोंदीची तपासणी केली. त्यात 364 कुणबी जाती दिसून आल्या.
धाराशिवमध्ये 40,49,131 नोंदी चेक करण्यात आल्या. त्यापैकी 459 कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या.
बीडमध्ये 22,33,035 नोंदी तपासल्या. त्यात 3,394 कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या.
एकूण 1 कोटी 73 लाख 70 हजार 659 कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यात 11 हजार 530 कुणबी जांतीच्या नोंदी आढळल्या