Nilesh Rane on Shivsena: बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, शिष्य कॅबिनेट मंत्री, पण सत्तेच्या सारीपाटात दिघे कुटुंब कुठे?; निलेश राणेंनी ठेवलं वर्मावर बोट
Nilesh Rane on Shivsena: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपण आनंद दीघेंवरील धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे हा सिनेमा पाहणार असल्याचं सांगितलं.
मुंबई: शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे (anand dighe) यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ हा सिनेमा आला आहे. या सिनेमाचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. यातील आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) यांचंही कौतुक होत आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच हा सिनेमा आल्याने त्याचा प्रचंड गवगवा सुरू आहे. आनंद दिघे यांच्या पोस्टरला शिवसेनेकडून दुधाचा अभिषेकही करण्यात आला आहे. एकीकडे हे सर्व सुरू असतानाच भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री आहे. दीघेंचे शिष्य एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री आहेत. शिंदेंचे चिरंजीव खासदार आहेत. पण सत्तेच्या सारीपाटात दिघे कुटुंबीय कुठे आहे? असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांनी थेट शिवसेनेच्या वर्मावरच बोट ठेवल्याने एकच चर्चा रंगली आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करून शिवसेनेला डिवचले आहे. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, “शिष्य” एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही पण निवडणूक आली की दिघे साहेब. आज दिघे साहेबांवर आधारीत धर्मवीर नावाचा चित्रपट रिलीज झाला. पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.
बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, “शिष्य” एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही पण निवडणूक आली की दिघे साहेब. आज दिघे साहेबांवर आधारित धर्मवीर नावाचा चित्रपट रिलीज झाला पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 13, 2022
धर्मवीर पाहणार
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपण आनंद दीघेंवरील धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे हा सिनेमा पाहणार असल्याचं सांगितलं. काल मी सिनेमा पाहायला जाऊ शकलो नाही. पण लवकरच हा सिनेमा पाहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
आनंद दिघेंची कार्यपद्धती चांगली होती
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी व्हिवियाना मॉलमध्ये जाऊन धर्मवीर हा सिनेमा पाहिला. यावेळी त्यांनी सिनेमावर प्रतिक्रिया व्यक्त केली. चित्रपट चांगला आहे .आनंद दिघे यांचा स्वभाव आणि कार्यपद्धती चांगली होती. शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे नाते जे होते त्यामध्ये प्रेम होतं. माझ्या वडिलांसोबत त्यांचे संबंध चांगले होते. ते ठाण्यात पेपर प्रॉडक्ट कंपनी येथे काम करत होते. नवीन तरुणांसाठी आक्रमकता सोडायची नाही. शिवसेना वाढणारच आहे आणि ठाण्याची शिवसेना मागे हटणार नाही. दिघे साहेबांचे महत्व महाराष्ट्रमध्ये देखील आहे. ते इतर जिल्ह्यात मार्गदर्शन करत असे. त्याचे मार्गदर्शन अनेकजण घेत असे, असं शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सांगितलं.