Politics: कोण कुणाच्या संपर्कात? कुणाची कुणाला ऑफर?, राज्यात सुरुयं अविश्वासाचं राजकारण? वाचा आजच्या दिवसभरातील 5 घटना
एकमेकांचे आमदार संपर्कात असल्याचा आणि मोठ्या नेत्यांना पक्षात येण्याच्या ऑफर्सही देण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसांत याने उच्चांक गाठलेला आहे. अशा पाच घटनावंर नजर टाकूयात.
मुंबई- राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांचे सरकार स्थापन होईन दोन महिने उलटले तरी अजूनही राज्यातील राजकारण निवताना दिसत नाहीये. आधी मंत्रिमंडळ विस्तार, त्यानंतर नाराजी, अधिवेशनात झालेले आरोप-प्रत्यारोप या सगळ्यानंतरही राजकीय राळ अजूनही सुरुच आहे. एकनाथ शिंदे गट विरुद्ध शिवसेना हा संघर्ष एकीकडे सुरु असतानाच शिवसेना (Shivsena)विरुद्ध भाजपा (BJP)असा संघर्षही राज्यात सुरु आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका लक्षात घेता हे राजकीय आरोप-प्रत्यारोप कमी होईल असे सध्यातरी दिसत नाहीये.
सुप्रीम कोर्टात राज्य सरकारचे भवितव्य सध्या टांगणीला लागलेले आहे. या सत्ता संघर्षाबाबत सुनावणी कधी होणार, हेही अद्याप निश्चित नाहीये.
अशा स्थितीत राज्यात प्रत्येक पक्षातील राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप तरी करतो आहे, किंवा अविश्वासाचं वातावरण निर्मितीला भर घालण्याचाच प्रयत्न करीत असल्याचे दिसते आहे.
एकमेकांचे आमदार संपर्कात असल्याचा आणि मोठ्या नेत्यांना पक्षात येण्याच्या ऑफर्सही देण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसांत याने उच्चांक गाठलेला आहे. अशा पाच घटनावंर नजर टाकूयात.
1. दोन आमदार शिवसेनेतून शिंदे गटात येतील – संदीपान भुमरे
राज्याचे रोहयो आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील दोन आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करत, नव्या वादाला तोंड फोडलेलं आहे. अशा स्थितीत संदीपान भुमरे यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा, असे उत्तर शिवसेनेकडून त्यांना देण्यात आले आहे. भुमरे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्या पैठण मतदारसंघातील आयोजित कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या होत्या.
2. १० ते १२ आमदार आमच्या संपर्कात – खैरे
दोन शिवसेनेचे आमदार संपर्कात असल्याचा दावा संदीपान भुमरे यांनी केल्यानंतर आता औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाचे १० ते १२ आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. यावरुनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आधी आहे ते पक्षातील उरलेले आमदार सांभाळा असे प्रत्युत्तर नितेश राणेंनी खैरे यांना दिले आहे.
3. पंकजाताईंना राष्ट्रवादीची ऑफर
राज्यात शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात आमदारांच्या चढाओढीची ही स्पर्धा सुरु असतानाचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीत येण्याची अप्रत्यक्ष ऑफर दिली आहे. एकनाथ खडसे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईमुळे भाजपा मोठा झाल्याचे मिटकरी यांनी सांगितले. मात्र या नेत्यांवर पक्षात अन्याय झाल्याचे त्यांनी सांगितले. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची आमदारकीही देणार नाही हे सांगत त्यांनी पंकजा यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली. यावरुनही नवा वाद सुरु झाला आहे. पंकजा मुंडे भाजपातून कुठेही जाणार नाहीत, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
4. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेट
हे सगळे राजकारण सुरु असतानाच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट झाली. सुमारे एक तास चाललेल्या या चर्चेत आगामी महापालिका निवडणुकांबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपा आणि मनसे हे एकत्र येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
5. पाच वर्षे सुप्रीम कोर्टात याचिकेवर सुनावणी सुरु राहणार – गोगावले
याच सगळ्यात एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि प्रतोद भरत गोगावले यांनी खळबळजनक विधान केले आहे. सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाची युरु असलेली सुनावणी ही पुढची पाच वर्षे अशीच सुरु राहणार असल्याचे वक्तव्य करुन त्यांनी राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडलेलं आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेकडेच राहील असेही वक्तव्य त्यांनी केले आहे. यावर शइंदे गटाकडून लगेचच सावध प्रतिक्रिया आली आहे. जी प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत, त्यावर बोलू नये, अशा सूचना सर्व आमदारांना देण्यात आल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.