BEST मध्ये नावाशिवाय काहीच ‘बेस्ट’ उरलं नाही; ही दुर्दशा कशामुळे, कोण जबाबदार?
कुर्ल्यात झालेल्या अपघातानंतर 'बेस्ट'ची दुर्दशा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. बेस्टचं वादग्रस्त 'वेट लीज मॉडेल' काय, बेस्टच्या दुर्दशेला कोण जबाबदार आहे, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. बेस्टची अशी अवस्था का झाली, त्याविषयीचं हे सविस्तर वृत्त..

मुंबईतील कुर्ला इथल्या बेस्ट बस अपघातात सातहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तर 42 जण जखमी झाले. या घटनेनंतर बेस्ट बसच्या सुरक्षित प्रवासाची हमी काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. गेल्या तीन वर्षांत ‘बेस्ट’च्या स्वत:च्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसेसचे 247 अपघात झाले आहेत. त्यात भाडेतत्त्वावरील बसचे सर्वाधिक अपघात आहेत. कुर्ल्यातील अपघातानंतर बेस्टचा ‘वेट लीज मॉडेल’ (Wet Lease Model) चर्चेत आला आहे. कारण गेल्या वर्षभरात वेट लीज कंत्राटदाराचा समावेश असलेली ही चौथी मोठी घटना आहे. कमी झालेलं उत्पन्न, वाढलेला खर्च, तिजोरीतील खडखडाट, कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर देण्यासाठी करावी लागणारी धावपळ अशी विचित्र अवस्था बेस्ट उपक्रमाची झाली आहे. एकूणच आर्थिक गणित बिघडल्याने बेस्ट उपक्रमाने स्वमालकीऐवजी भाडेतत्त्वावर बसगाड्या घेण्याचा सपाटा लावला आहे. बेस्ट उपक्रमात 2018 पासून भाडेतत्त्वावरील बसच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत भाडेतत्त्वावरील बसबाबत प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. बेस्टची अशी अवस्था का झाली, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.. ...