मुंबईचा ‘सिकंदर’ कोण? महापालिका निवडणुकीचे रणकंदन सुरु
2012 आणि 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांची आकडेवारी पाहता महाविकास आघाडीला कितपत यश मिळेल याची साशंकता आहे. मात्र, ही निवडणूक जिंकून मुंबईत आपलाच महापौर बसविण्यासाठी उद्धव ठाकरे गट मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्याशी उठाव करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार झटका दिला. एकनाथ शिंदे यांना मुंबईतील दोन खासदार, पाच आमदार आणि नऊ नगरसेवकांची साथ आहे. मुंबईसारख्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यातच शिंदे गटाला भाजपची साथ मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर आगामी निवडणूका जिंकण्याचे मोठे आव्हान आहे. आगामी निवडणूका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. पण, 2012 आणि 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांची आकडेवारी पाहता महाविकास आघाडीला कितपत यश मिळेल याची साशंकता आहे. मात्र, ही निवडणूक जिंकून मुंबईत आपलाच महापौर बसविण्यासाठी उद्धव ठाकरे गट मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्ष न्यायालयात जाऊन पोहोचला. त्यावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निकाल दिला. तर, दुसऱ्याच दिवशी कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहीर झाला. त्यात भाजपचा पराभव झाला. या दोन्ही निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटात आनंदाचे वातावरण आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बैठक बोलवून आगामी निवडणूक एकत्र लढविण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे आगामी महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ( उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्र्रवादी आणि काँग्रेस ) विरुद्ध भाजप शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) यांच्यात जोरदार काटे कि टक्कर असणार आहे.
मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीची स्थिती काय?
महाविकास आघाडीतील शिवसेनेला 2012 मध्ये 75 तर 2017 मध्ये 84 जागा मिळाल्या. शिवसेना 9 जागांनी वाढली. तर, मनसेच्या 7 पैकी 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ही संख्या 90 इतकी झाली. पण, शिंदे यांच्यासोबत 9 नगरसेवक गेल्यामुळे शिवेसनेची संख्या 81 इतकी राहिली आहे.
काँग्रेसला 2012 मध्ये 52 तर 2017 मध्ये 31 जागा मिळाल्या. काँग्रेसच्या 21 जागा घटल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचीही अवस्था तशीच आहे. राष्ट्रवादीला 2012 मध्ये 13 जागा मिळाल्या त्यात 2017 मध्ये घेत होऊन केवळ 9 जागा मिळाल्या. 4 जागी संख्या घेतली.
त्यामुळे महाविकास आघाडीकडे आता शिवसेना (81), काँग्रेस (31) आणि राष्ट्रवादी (9) असे एकूण 121 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. याशिवाय अपक्ष, समाजवादी पार्टी यांचीही साथ आहे.
शिंदे गटाचा भाजपला फायदा की तोटा ?
2012 मध्ये भाजपला केवळ 31 जागा मिळाल्या होत्या. पण, 2017 मध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत 82 जागा जिंकल्या. भाजपच्या तब्बल 51 जागा वाढल्या.
भाजपसोबत आता शिंदे गटाकडे असलेले 9 नगरसेवक आल्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे भाजप, शिंदे गटाच्या नगरसेवकांची संख्या एकूण 91 इतकी झाली आहे.
मुंबईत उद्धव ठाकरे यांना बहुमत मिळेल का?
उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती मिळत आहे. पण, त्यांचे सहकारी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची कामगिरी 2012 च्या तुलनेत 2017 ची कामगिरी घसरलेली दिसते. तर, शिवसेना उमेदवारांसमोर मनसे आणि भाजप, शिंदे गट असे दुहेरी आव्हान असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना अधिक जागा जिंकून आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल.
शिंदे गटात प्रवेश केलेले मुंबईतील नेते कोण ?
खासदार – शिवसेनेचे ज्येष्ट नेते गजानन कीर्तिकर, खासदार राहुल शेवाळे
आमदार – यामिनी जाधव (भायखळा) ,सदा सरवणकर (माहीम), मंगेश कुडाळकर (कुर्ला), दिलीप लांडे (चांदिवली), प्रकाश सुर्वे (मागाठणे)
नगरसेवक – माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, नगरसेवक दिलीप लांडे, समाधान सरवणकर, शीतल म्हात्रे, परमेश्वर कदम, वैशाली शेवाळे, संतोष खरात, आत्माराम चाचे, अमेय घोले