Winter Session : प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचितचा आज विधानभवनावर मोर्चा, पोलीस बंदोबस्तात वाढ
हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आज वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे.
मुंबई : हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आज वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे रस्त्यावर उतरणार असून ते स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. या मोर्चात सहभागी होण्यासाठी वंचितचे कार्यकर्ते राज्यभरातून मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चाला सीएसटीमधून सुरुवात होणार असून, तो नंतर विधानभवनावर धडकणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
‘जमावबंदीच्या नावाखाली आमचा आवाज दाबता येणार नाही’
‘वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी विधानसभा अधिवेशनावर 23 डिसेंबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र राज्य सरकार मुंबईमध्ये विनाकारण जमावबंदी लागू करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. मुंबईत जमावबंदी लावण्याचे कोणतेही सबळ कारण दिसत नाहीये. सरकार कायद्याचा दुरुपयोग करून जनतेचा आवाज दाबणार असेल तर सरकारचा जमावबंदी आदेश झुगारून आम्ही मोर्चा काढू’, असा इशारा आंबेडकर यांनी यापूर्वीच दिलाय.
आंदोलन रोखण्याचा सरकारचा प्रयत्न
ओबीसींच्या आरक्षणाबाबत केंद्र व राज्य सरकार दोन्हीकडून फसवणूक केली जात आहे. जाती निहाय जनगणनेशिवाय सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित इम्पेरीकल डाटा देता येणार नाही व दोन्ही सरकार या बाबतीत गंभीर दिसत नाहीत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारातून ओबीसींच्या न्यायीक मागण्यांसाठी 23 डिसेंबर रोजी राज्यव्यापी मोर्चा काढण्याची घोषणा वंचितकडून करण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने मुंबईत जमावबंदी आदेश लागू केल्याने अधिवेशन काळात विविध मागण्यांसाठी होणाऱ्या आंदोलनाला रोखण्याचाच हा प्रयत्न असल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली आहे.
संबंधित बातम्या
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी; बंगळूरूमधून एकाला अटक
स्वतःची किंमत वाढवण्यासाठी अजित पवारांवर टीका; धनंजय मुंडेंचा पडळकरांना टोला