खरा बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर होतो; अमोल मिटकरी यांचा भाजपवर पलटवार
Amol Mitkari on Pravin Darekar Statement About Ajit Pawar : भाजप नेत्याचा अजित पवारांना टोला... सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच खोचक टोला, काय कारण? भाजप नेत्याच्या वक्तव्याला अजित पवार गटातील नेत्याचं प्रत्युत्तर, पाहा नेमका वाद काय आहे? वाचा सविस्तर...
गजानन उमाटे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नागपूर | 20 डिसेंबर 2023 : RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काल बौद्धीक कार्यक्रम काल पार पडला. नागपुरातील रेशीमबाग या संघाच्या कार्यालयात बौद्धीक कार्यक्रम पार पडला. भाजपसहीत शिंदे गटाच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. मात्र अजित पवार स्वत: किंवा त्यांच्या गटातील एकही आमदार अथवा मंत्री संघाच्या बौद्धीकास हजर नव्हता. याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. आता यावरून आरोप प्रत्यारोप होताना दिसतायेत. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांच्या अनुपस्थितीवरून टोला लगावला. दरेकरांना अजित पवार गटातील नेत्यांनी उत्तर दिलं आहे.
प्रवीण दरेकर काय म्हणाले?
अजित पवार आणि त्याचे आमदार का आले नाहीत? हे अजित पवार किंवा त्यांचे नेते सांगू शकतील. कार्यक्रमात येऊन दर्शन घ्यायला हरकत नव्हती. संघ मुख्यलयात दर्शन घ्यायला विचार गुंडाळून ठेवावे लागत नाहीत, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
अजितदादा आणि त्यांच्या आमदारांनी इथे यायला हवं होतं. रेशीमबागेत आल्यावर लगेच काही बिघडलं नसतं. इथे येऊन विचारांची शिदोरी घेऊन जाता येतं. इथे येऊन प्रेरणा मिळते. जाती-जातीत भेद होऊ नये हिच संघाची भूमिका आहे.यामुळे भाजपचं नुकसान होत नाही. संघाचं बौद्धिक फायद्याचं आहे, असं दरेकर म्हणालेत.
अजित पवार गटाचं उत्तर
प्रवीण दरेकर यांनी टोला लगावल्यानंतर अजित पवार गटाकडूनही त्यांना प्रत्युत्तर दिलं गेलं. अजित पवार गटाचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी प्रवीण दरेकरांच्या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. खरा बौद्धिक वर्ग हा दिक्षाभूमीवर असतो. आम्ही शाहू, फुले आंबेडकरांचे अनुयायी आहोत. लोकशाही तत्वावर आमचा पक्ष चालतो. आमच्या पक्षाची विचारधाराही लोकशाहीवादी आहे. ज्यांना जे वाटतं त्यांनी केलं पाहिजे, हे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये लिहिलं आहे.त्याचं पालन प्रत्येकजण करतं. ज्यांना संघ शाखेत जावं वाटतं त्यांनी तिकडं जावं. ज्यांना दीक्षाभूमीवर जावं वाटतं त्यांनी दीक्षाभूमीवर जावं, असं अमोल मिटकरी म्हणालेत.