Nagpur Fraud : आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी, नागपुरात अशी झाली महिलेची फसवणूक
आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करण्यात आली. अज्ञात आरोपीविरोधात नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेने आपला फ्लॅट भाड्याने देण्यासाठी जाहिरात दिली होती. त्यातूनही फसवणूक झाली.
नागपूर : मुंबईमध्ये राहणाऱ्या एका महिलेने (Women) आपला नागपुरातील फ्लॅट भाड्याने देण्यासाठी जाहिरात दिली. त्या जाहिरातीवरून तिला एक फोन आला. फोन करणाऱ्याने आपण आर्मी ऑफिसर (Army Officer) आहोत. जम्मू-काश्मीरमध्ये आपली पोस्टिंग आहे. मात्र मला नागपुरात भाड्याने घर पाहिजे असं सांगितलं. आपली ओळख दाखविण्यासाठी त्याने आपलं आर्मीच ओळखपत्र आणि कॅन्टीनचं कार्ड महिलेला पाठविलं. त्यावरून महिलेने त्याला होकार दिला. मात्र आपण तिथे येऊ शकत नाही. त्यामुळे ऑनलाईन ट्रांजेक्शन (transaction) कराव लागेल, असं त्यानं सांगितलं. महिलेला आपल्या अकाउंटवर एक रुपया टाकण्यास सांगितलं. महिलेने एक रुपया ट्रान्सफर केला. त्यानंतर त्याने आणखी पंधरा हजार रुपये टाकण्यास सांगितले. महिलेने तेही केले.
सायबर सेलमार्फत चौकशी
मात्र काही वेळात पुन्हा त्याचा फोन आला. ट्रांजेक्शनमध्ये प्रॉब्लेम होत आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा पंधरा हजार रुपये टाका, असं त्यानं सांगितलं. त्यानंतर महिलेला संशय आला. तिने सायबर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सायबर सेलमार्फत याची चौकशी केली जात आहे.अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश सागडे यांनी दिली.
पोलिसांचं सावधानतेचं आवाहन
आरोपीने महिलेचा विश्वास पटावा, यासाठी आर्मी ऑफिसर असल्याचा आयडेंटिटी कार्ड आणि कॅन्टींग कार्डसुद्धा तिला पाठविला. मात्र त्यातून महिलेची फसवणूक झाली. कुठलाही आर्मी ऑफिसर स्वतःचा आयडेंटिटी कार्ड कोणाला पाठवत नसतो. त्यामुळे असा प्रकार जर केला असेल तर तो फ्रॉड आहे. असं समजून त्याची पोलिसात तक्रार करावी असा आवाहन पोलिसांनी केलं आहे. महिलेने आपला फ्लॅट भाड्याने देण्यासाठी जाहिरात दिली होती. त्यातूनही फसवणूक झाली.