Nagpur | मानकापूर स्टेडियमवर 27 मार्चला एरोमॉडेलिंग शो, क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिस्त, सैन्यदल एरोमॉडेलिंग तसेच नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी कार्यक्रम होणार आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनी प्रथम क्रमांक मिळालेल्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या पथकाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही होणार आहे. तसेच या ठिकाणी एरोमॉडेलिंग शोमध्ये विविध साहसी कार्यक्रम होतील.
नागपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त येत्या 27 मार्च रोजी शहरातील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या (Departmental Sports Complex) मैदानावर सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले आहे. आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य कुमार अवस्थेत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे, यासाठी राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाची ही झेप आहे. असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार (Youth Welfare Minister Sunil Kedar) यांनी केले आहे. या एरोमॉडेलिंग शोच्या (Aeromodelling Show) माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आपल्या आवडीच्या क्षेत्रात अग्रेसर होण्याची जिद्द तसेच एरोमॉडलिंग क्षेत्रामध्ये आवड निर्माण व्हावी. निर्मितीचे विविध क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी खुले व्हावे, अवकाशाची गुढता जाणण्याची जिज्ञासा निर्माण व्हावी. हा उद्देश असून हा शो सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाच हजार विद्यार्थी सहभागी होणार
यावेळी क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, एनसीसीचे वरिष्ठ अधिकारी कर्नल परमवीर शर्मा उपस्थित होते. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून क्रीडा व युवक सेवा विभाग व राष्ट्रीय छात्र सेनाच्या संयुक्त विद्यमाने एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या 20 ते 25 विमानांचे आकाशातून पथ संचलन आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. यामध्ये हॉर्स रायडिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, एनसीसीचे विविध अत्याधुनिक यंत्र, शस्त्रात्रांची माहितीवर्धक प्रदर्शनी तसेच ॲथलेटिक्स स्टेडियम पॅव्हेलियन इमारतीचे लोकार्पण कार्यक्रमांचा समावेश आहे. तसेच एरोमॉडेल्स, वायुसेना, नौदलांचे अत्याधुनिक यंत्रे, शस्त्रात्रे, सेवा तसेच एन.सी.सी. आदी संदर्भात यामध्ये माहिती दिल्या जाणार आहे.
विद्यार्थ्यांना पोलीस भरती बोनस गुण
यावेळी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी महाराष्ट्र शासनाने नव्या अधिनियमानुसार आता एनसीसी विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. राज्य शासनाने नुकत्याच जारी केलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमाची माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली. एनसीसीचे क प्रमाणपत्र ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त आहे त्यांना पोलीस भरतीच्या परीक्षेच्या एकूण गुणांच्या 5% अधिक बोनस गुण दिले जातील. ब प्रमाणपत्र प्राप्त असणाऱ्यांना 3 % तर एनसीसी अ प्रमाणपत्र प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एकूण गुणांच्या 2% अधिकचे बोनस गुण दिले जातील, असे त्यांनी सांगितले. नागपूर शहरातील विविध शाळांमधून सुमारे पाच हजार विद्यार्थी तसेच गणमान्य व्यक्ती, मान्यवर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पालक, नागरिक व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी राहतील. असे सुमारे दोन हजार व्यक्ती तसेच कार्यक्रमात व्यवस्थापनासाठी एनसीसीचे अधिकारी, छात्र या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. विद्यार्थ्यांनी अवश्य बघावे, असे हे आयोजन आहे. सकाळी सात ते नऊ या दोन तासांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.