‘म्हणे बारामतीत घड्याळचा करेक्ट कार्यक्रम करणार, मी मनावर घेतलं तर…’, अजित पवार यांचा भाजप नेत्यावर निशाणा
"अलिकडे सप्टेंबर महिन्यात भाजपचं सरकार आल्यानंतर भाजपचे एक नेते बारामतीत आले. त्यांनी सांगितलं, बारामतीत घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशा प्रकारच्या वल्गना करतात", असं अजित पवार म्हणाले.
नागपूर : “अलिकडे सप्टेंबर महिन्यात भाजपचं सरकार आल्यानंतर भाजपचे एक नेते बारामतीत आले. त्यांनी सांगितलं, बारामतीत घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशा प्रकारच्या वल्गना करतात. आता आमचं तिथे काम आहे. खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? मी जर मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल”, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत उघडपणे दिला. यावेळी अजित पवारांनी चांगलीच फटकेबाजी केली.
“महाराष्ट्राला माहितीय, मी कुणाला चॅलेंज दिलं ना तर कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्रजी सांगतात तसं, मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही. हे पण खरं आहे. त्यांना म्हणावं थोडं दमानं. फार गाडी फास्ट चालली. वेगाने गाडी गेली तर अपघात होईल”, अशा शब्दांत अजित पवारांनी सुनावलं.
अजित पवारांनी भर सभागृहात फडणवीसांची केली नक्कल
अजित पवारांनी एसआयटी चौकशीवरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नक्कल केली. “आपल्या राज्याला ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स, एनआयए माहिती होतं, पण आता एसआयटी नवं आलंय. काहीही झालं की लगेच एसआयटी लावाची मागणी आणि लगेच इकडून उत्तर ठीक आहे हे तपासून घेतो आणि योग्य असेल तर एसआयटी लावतो”, असं म्हणज अजित पवारांनी फडणवीसांची नक्कल केली.
“अरे काय लावतो आणि करतो. त्यापेक्षा महाराष्ट्रात महागाई आकाशाला भिडली आहे, बेरोजगार आहे. तरुणांना काम नाही. अनेक प्रश्न आहेत. उद्योगांची गुंतवणूक झाली पाहिजे. शेतकऱ्यांची आत्महत्या वाढली आहे. आमच्यापेक्षा तुमच्याकडे चांगल्या कल्पना असतील तर त्या लागू करा. आम्ही त्याला पाठिंबा देऊ”, असं अजित पवार म्हणाले.
‘आमच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला’
“मराठवाडा मागसलेला भाग आहे. पण तिथेही अनेकवर्ष मुख्यमंत्रीपद होतं. राज्याचा विचार करत असताना नळगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्पाबद्दल सभागृहातील अनेक सदस्यांनी विचार मांडले. जवळपास 80-80 हजार कोटींचा हा प्रकल्प करु पाहतोय. त्याबद्दल सगळे सकारात्मक आहेत. आमचा त्यासाठी पूर्ण पाठिंबा आहे”, असं पवार म्हणाले.
“वाशिमच्या लोकप्रतिनिधींना विचारा, मी खात्याचा मंत्री होतो, बॅरेजेस मंजूर करण्याचं आणि अधिक पाणी देण्याचं काम केलं. मी ते करण्याचा मनापासून प्रयत्न केला. त्यासाठी मी कुठेही दुजेभाव ठेवला नाही. उलट हे प्रकल्प वेगात होण्यासाठी काही पावलं उचलली. पण त्यातून आमची मोठ्या प्रमाणात बदनामी करण्याचं काम करण्यात आलं. आमच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला”, अशी टीका अजित पवारांनी केली.
अनिल देशमुखांवरुन सरकारवर निशाणा
“ठीक आहे, लोकशाही आहे, लोकशाहीत अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. आपल्याला त्याला सामोरं जायचं असतं. आजपण मला ती बातमी खरी की खोटीय त्याबाबत खात्री नाहीय. अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्याची माहिती समोर आलीय”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
“अनिल देशमुख यांच्यावर त्यावेळच्या मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी आरोप केले होते. त्या आरोपांमध्ये काहीच तथ्य निघालं नाही. पण अनिल देशमुख असतील किंवा छगन भुजबळ असतील, कुणीही असेल, माझी एवढीच विनंती आहे प्रत्येकाच्या आयुष्यात गुन्हा सिद्ध न होता सहा महिने, एक-दोन वर्ष जेलमध्ये टाकणं, ही काही मोघलाई आहे का?”, असा सवाल अजित पवारांनी केला.
“गुन्हा सिद्ध झाल्यावर जो काही एक-दोन वर्ष, पाच वर्ष किंवा जन्मठेप असेल, जी काही शिक्षा असेल ती शिक्षा द्यावी. पण प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील इतके दिवस वाया गेले, त्यामुळे संपूर्ण कुटुंब डिस्टर्ब होतं. आम्हीही सत्तेत होतो. कुणाला तडीपार करणं, कारण नसताना मोक्का लावणं अशा गोष्टी करु नये. तुम्ही आता सत्तेवर आलात. आता एसआयटी आलं”, असा टोला अजित पवारांनी लगावला.
“भाजपमध्ये आता महाराष्ट्रात जे नेते काम करत आहेत त्यामध्ये सर्वात ताकदवार नेता देवेंद्र फडणवीस आहेत. कुणी काहीही म्हटलं तरी जे आहे ते आहे. असं असताना आपण काही लोकांना संधी दिलेली आहे. पण तुम्ही ज्यांना संधी दिलीय ते सभागृहाचे सभासदही आहेत. ते म्हणतात की, महाविकास आघाडी सरकारने विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय केला. त्यांनी तसं बोलून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही कितीही टीका केला मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्राचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केला”, असं अजित पवार म्हणाले.