Ajit Pawar : चुकीचे सल्ले महाराष्ट्रात चालणार नाही, मनसेला पुन्हा अजित पवारांनी बजावलं, तर गडकरी भेटीचं कारणही सांगितलं
आपल्या नागपूर दौऱ्यात बदल करून अजित पवारांनी (Ajit Pawar) जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली. त्यामुळे राजकारणाचा ससपेन्स आणखी वाढला होता. मात्र ससपेन्स अजित पवारांनीच संपला आहे. त्यांनी नितीन गडकरी यांच्या भेटीचे कारणही सांगितलं आहे.
मुंबई : राज्यात सध्या मनसेने हिंदुत्वावरून घेतलली भूमिका आणि राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सभांचा लावलेला सपाटा यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबादेतल्या सभेवरूनही जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे. तर दुसरीकडे आज महाविकास आघाडीचे नेते नागपुरात होते. आपल्या नागपूर दौऱ्यात बदल करून अजित पवारांनी (Ajit Pawar) जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली. त्यामुळे राजकारणाचा ससपेन्स आणखी वाढला होता. मात्र ससपेन्स अजित पवारांनीच संपला आहे. त्यांनी नितीन गडकरी यांच्या भेटीचे कारणही सांगितलं आहे. गडकरी साहेबांचा निरोप आला, की महाराष्ट्रातील विकास कामांबाबत बोलायचे आहे, त्यामुळे तिकडे गेलो. गडकरी यांनी सांगितले की गेल्या वर्षी सेंट्रल फंड मधून 600 कोटी रुपयांची कामं भाजप आणि महाविकास आघाडी सरकारकडून करुन घायची होती, त्यासाठी मान्यता द्यायची होती ती त्यांनी दिली, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. तर दुसरीकडे मनसेला अजित पवारांनी नागपुरातूनही पुन्हा बजावलं आहे.
काही लोकांकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
मनसेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले. राज्यात काही नेते तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपलं राजकारण करत आहेत ते योग्य नाही. आता सणाचे दिवस आहेत, एकमेकांना मदत करून जातीय सलोखा निर्माण केला पाहिजे. कारण कोरोनात मागे गेलो ते दूर करायचं आहे. मात्र आता भोंग्याचं राजकारण सुरू झालं गरज नसताना कोणीतरी भोंगा काढतो. सगळ्यांना सारखा अधिकार आहे. आपण सगळे भारतीय म्हणून जगतो. मग का वातावरण निर्माण केलं जातं? भोंग्यावरून आम्ही सगळ्या पक्षांना बैठकीला बोलावलं होतं समन्वयाने यावर मार्ग काढावा, वाद व्हायला नको म्हणून प्रयत्न केला. भाजप आला नाही तो त्यांचा प्रश्न आहे, असेही अजित पवार म्हणाले.
चुकीचे सल्ले चालणार नाही
तसेच काही लोक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करतात त्यांची नोंद आता जनतेने घेतली पाहिजे. चुकीचे सल्ले या महाराष्ट्राला चालणार नाही. महागाई सारखे विषय आहेत, त्यावर बोलायला पाहिजे मात्र ते होत नाही. या अर्थसंकल्पात कुठलाही टॅक्स वाढविला नाही. अनेक प्रकल्प राबवत आहोत. चांगले प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू असताना काही नेते वेगळं वातवरण निर्माण करत आहेत हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, असे आवाहान अजित पवार जनतेला करताना दिसून आले. तसेच येणाऱ्या निवडणुकीत आपला पक्ष वाढला पाहिजे. इथे आपले नगरसेवक आमदार असले पाहिजे. पूर्व नागपुरात भाजपचे आमदार आहेत, मात्र स्मार्ट सिटीमध्ये अनेकांची घरं गेली मात्र त्यांना पैसे मिळाले नाही. डम्पिंग यार्ड मुळे या परिसरात दुर्गंधी पसरते. मग इथले आमदार काय करत आहेत? ते लक्ष का घालत नाही? असा सवालही अजित पवारांनी केला आहे.
राष्ट्रवादी आणखी मजबूत करणार
तर विकासकामांबाबत बोलताना, ओसीडब्लू योजना फेल झाली आहे. लोकांना पाणी मिळत नाही. महापालिकेच्या शाळा बंद पडल्या मग गरिबांच्या मुलांनी कुठे जायचे? आता आम्ही दिल्लीच्या धर्तीवर डीपीसी च्या माध्यमातून शाळा चालविण्याचा प्रयत्न करतो. भाजपच्या तुलनेत इथे राष्ट्रवादी मजबूत होऊ शकली नाही. मात्र तुम्ही आशीर्वाद द्या. आम्ही मजबूत करून दाखवतो आमच्या बारामती , पिंपरी चिंचवड प्रमाणे विकास करून दाखवतो. असेही अजित पवार म्हणाले. तसेच महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात मुला मुलींची वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. महाज्योती आणि सारथीचे विध्यर्थी सुद्धा यात येतील. पोलीस इमारत नागपुरात बनली त्याची सुरवात देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि पुढे अनिल देशमुख यांनी नेलं. मला नागपुरात आणखी वेळ द्यायचा आहे ,आता जेवढा द्यायला पाहिजे होता तेवढा देऊ शकलो नाही. कार्यकर्ते वेळ मागत आहेत. असेही अजित पवार यांनी सांगितले.
दुसऱ्यांच्या हट्टापायी एसटी कर्मचाऱ्यांचं नुकासान
लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करतो,आम्हाला राजकारण करायचं नाही समाजकारण करायचं आहे, राजकारण फक्त निवडणुकी पुरतं असतं. एसटी संप झाला त्यात काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली संप लांबला. नुकसान मोठं झालं. प्रवाशांचं नुकसान झालं जे कामावर आले नाहीत, त्यांचं नुकसान झालं. कोणाच्या तरी हट्ट पायी कामगारांनी ऐकलं नाही आणि नुकसान करून घेतलं, असेही अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखवलं.